शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम ठप्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

आज होणार निर्णय 
कंत्राटदार काम करीत नसल्याने नवीन कंत्राटदार शोधून ‘रिस्क ॲण्ड कॉस्ट’वर हे काम करण्याचे सोमवारच्या बैठकीत ठरले. मात्र, यावर पुन्हा चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यासाठी महापौरांनी मंगळवारी (ता. दोन) दुपारी दुसरी बैठक बोलावली आहे. यावेळी कंत्राटदार गायत्री आर्किटेक्‍टच्या प्रतिनिधीसोबत चर्चा केली जाणार आहे.

औरंगाबाद - क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम ठप्प आहे. कार्यारंभ आदेश देऊन सहा महिन्यांचा अवधी उलटला तरी कंत्राटदाराने काम सुरू केलेले नाही. त्यामुळे आता महापालिकेने ‘रिस्क ॲण्ड कॉस्ट’वर दुसऱ्या कंत्राटदाराकडून हे काम करून घेण्याचा विचार सुरू केला आहे. 

क्रांती चौकातील पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम गायत्री आर्किटेक्‍टला एक कोटी ८४ लाख ५३ हजार ५७२ रुपयांमध्ये देण्यात आले आहे. कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही कंत्राटदाराने काम सुरू केलेले नाही. आधी पैसे द्या, नंतरच काम सुरू करतो, ही कंत्राटदाराची मागणी अद्याप कायम आहे. यासंदर्भात महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी (ता. एक) महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी कंत्राटदार काम करण्यास तयार नसल्याचे सांगितले. त्यावर पदाधिकाऱ्यांनी काम सुरू केल्यानंतर कंत्राटदाराने अर्ध्यावरच काम सोडले तर पुन्हा महापालिकेची बदनामी होईल, अशी भीती व्यक्त केली. यावर पर्याय म्हणून ‘रिस्क ॲण्ड कॉस्ट’वर आता हे काम पूर्ण करण्याचा विचार सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivaji maharaj Statue Height Work Stop