शिवाजीनगर, टीव्ही सेंटरला तणाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

औरंगाबाद - शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांच्या घरी पोलिस धडकल्याचे समजताच मोठा जमाव हातात हत्यारे, लाठ्या-काठ्या घेऊन रस्त्यावर उतरला. त्यामुळे येथे काही काळ तणावाची स्थिती होती. जंजाळ यांच्या घरासमोर मोठी गर्दी जमली होती.

औरंगाबाद - शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांच्या घरी पोलिस धडकल्याचे समजताच मोठा जमाव हातात हत्यारे, लाठ्या-काठ्या घेऊन रस्त्यावर उतरला. त्यामुळे येथे काही काळ तणावाची स्थिती होती. जंजाळ यांच्या घरासमोर मोठी गर्दी जमली होती.

दंगल प्रकरणात राजेंद्र जंजाळ यांचे नाव पुढे आले. त्यानंतर त्यांच्या चौकशीसाठी पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे, राहुल श्रीरामे, सहायक आयुक्त ज्ञानोबा मुंडे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांचे पथक गेले. ही बाब समजताच या भागात जमाव रस्त्यावर आला. त्यांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याच्या सूचना केल्या. जमाव निघून गेल्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने पुन्हा उघडली. जंजाळ यांना ताब्यात घेण्याच्या पोलिसांच्या हालचाली पाहून या भागातील नागरिक, कार्यकर्त्यांनी गर्दी केली व जंजाळ यांना ताब्यात घेण्यास विरोध केला. परंतु, स्वत:हून जंजाळ ठाण्यात येण्यास तयार झाल्याने परिस्थिती आटोक्‍यात आली. दरम्यान, त्यांच्या अटकेची माहिती समजताच या भागातील दुकाने पुन्हा बंद करण्यात आली. टीव्ही सेंटर येथेही जमाव आल्याने व्यापाऱ्यांनी आपली दुकाने पटापट बंद केली होती. मात्र, दोन्ही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावल्याने संभाव्य अुनचित प्रकार टळला.

घटनाक्रम 
सकाळी दहाच्या सुमारास पोलिस पथक चौकशीसाठी जंजाळ यांच्या घरी गेले
अर्धा तास चौकशी, साडेदहा वाजता जंजाळ यांना ताब्यात घेण्यासाठी हालचाली
जंजाळ यांच्या घरी पोलिस आल्याचे समजताच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
पावणेअकरा वाजता मोठा जमाव; हत्यारे, लाठ्या घेऊन रस्त्यावर चालून आला
शिवाजीनगर भागात नागरिकांनी दुकाने बंद केली, सुरक्षेसाठी परिसरात मोठा बंदोबस्त
जंजाळ पोलिसांसोबत येण्यास तयार, साडेअकराला त्यांच्याच वाहनात क्रांती चौक ठाण्यात नेले
क्रांती चौकात दुपारी दीडनंतर अटकेची कारवाई

Web Title: Shivajinagar TV center area in tension