महाशिवरात्री व्हिडिओ : शिवालये गजबजली भाविक भक्तांनी 

कैलास चव्हाण
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

परभणी शहरातील सर्व महादेव मंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी  ‘हर हर महादेव’ आणि ‘जय शिवशंकर’चा गजर घुमला.

परभणी : शहरासह जिल्हाभरात शुक्रवारी (ता.२१) पहाटेपासून महाशिवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. ‘हर हर महादेव’ आणि ‘जय शिवशंकर’ असा गजर करीत महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जात असून यानिमित्त शिवालयात भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली आहे. शहरातील पारदेश्वर, बेलेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

Image may contain: 3 people, people standing and indoor
परभणी : पारदेश्वर मंदिरातील पाऱ्याचा महादेव.

महाशिवरात्रीनिमित्त शहरातील विविध शिवालयात पहाटेपासून गर्दी पहायला मिळत आहे. पारदेश्वर मंदिरात पारदेश्वराच्या दर्शनासाठी शुक्रवारी भल्यापहाटेपासून दर्शनासाठी भाविकांनी येथे गर्दी केली असून अजुनही रांगा सुरु आहेत. दर्शनासाठी भाविकांनी येथे मोठ्या रांगा लावल्या आहेत. भाविक भक्तांत महिला भाविकांची मोठी संख्या आहे. 

पारदेश्वर मंदिर संस्थानतर्फे रथयात्रा
पारदेश्वर मंदिर संस्थानतर्फे रथयात्रा काढण्यात आली. त्यात भजनी मंडळे, महिला मंडळ, कलशधारी महिला, मुली यांनी सहभाग घेतला. मंदिराबाहेर प्रसादाची दुकाने थाटली असून या मंदिरास सकाळपासून जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पारदेश्वर मंदिराप्रमाणेच शहरातील सर्वात जुने मंदिर म्हणून ओळख असलेल्या नांदखेडा रस्त्यावरील बेलेश्वर मंदिरातही भल्या पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या आहेत. पहाटे ‘श्रीं’ ची महापूजा करण्यात आली. मंदिर परिसरात प्रसादासह फुलांची दुकाने थाटली आहेत. शिवरात्रीनिमित्त महाप्रसादही देण्यात येत आहे. 

Image may contain: 9 people, wedding
पारदेश्वर मंदिरात दर्शनासाठी लागलेली रांग.

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन 
शहरातील कारेगाव रस्त्यावरील सोमनाथ मंदिरात (उघडा महादेव) दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली असून येथे शिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर कृषी विद्यापीठातील बळेश्वर, प्रशासकीय इमारत परिसरातील शिव मंदिर, समाधान कॉलनीतील ओंकारेश्वर महादेव मंदिरातही मोठे धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. या सर्वच मंदिरातून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी झाली आहे.

Image may contain: 3 people, people standing, wedding and indoor
महाशिवरात्रीनिमित्त पारदेश्वर मंदिरात भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले.

मोफत आरोग्य तपासणी
पारदेश्वर मंदिर येथे सरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यालयाच्यावतीने दंत व नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या वेळी आलेल्या भाविकांची तपासणी करण्यात आली.

बाजारपेठेत फराळाच्या पदार्थांची विक्री
शहरातील बाजारपेठेत महाशिवरात्रीनिमित्त सकाळी बाजारात फराळाच्या पदार्थांची गर्दी झाली होती. गांधी पार्क, कडबी मंडी, विद्यापीठ गेट या भाजी मार्केटमध्ये वेगवेगळे फराळाचे पदार्थ विक्रीसाठी आले होते. शुक्रवारी महाशिवरात्रीची शासकीय सुट्टी असल्याने सरकारी कार्यालय, शाळा, महाविद्यालय, बॅंका बंद होत्या. त्यामुळे बाजारात गर्दी वाढली होती.

गोदाकाठी उत्साहाला आले उधान
जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदी काठी शिवालयांची श्रृखंला आहे. पाथरी, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या तालुक्यात नदीकाठी प्रसिद्ध शिवमंदिरे आहेत. उत्तम हेमाडपंथी आणि स्थापत्य कलेचा नमुना असलेल्या या मंदिरांना विशेष असे महत्व आहे. पाथरी तालुक्यातील मुदगलेश्वर, रामपूरी रत्नेश्वर, धारासूर (ता.गंगाखेड), कंठेश्वर, वझुर आदी गावात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या गर्दीने यात्रेचे स्वरुप आले आहे. तसेच वालुर, बोरी, चारठाणा, एरंडेश्वर, गंगाखेड, पालम आदी ठिकाणच्या शिवालयात गर्दी झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivalayas are full of devotees