शिवसंग्रामचा विधानसभेसाठी बीडसह अन्य 11 जागांवर दावा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

महायुतीचा भाग म्हणूनच काम करणार : आमदार विनायकराव मेटे

अकोला ः विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम पक्ष भाजप-शिवसेना महायुतीचा घटक पक्ष म्हणूनच काम करणार आहे. आम्ही पक्षासाठी राज्यात 12 जागांवर दावा केला. यावेळी मुख्यमंत्री आमच्यावर राजकीय अन्याय होऊ देणार नाही, असा विश्‍वास शिवसंग्राम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांनी शुक्रवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

आगामी निवडणुकीच्या निमित्ताने अकोला जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी आमदार मेटे अकोल्यात आले होते. दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसंग्राम पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पुणे येथे झालेल्या पक्षाच्या  कार्यकारिणीत महायुतीचा घटक व भाजपचा मित्र पक्ष म्हणून काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राज्यात बीड व अकोला जिल्ह्यातील बाळापूरसह 12 जागांवर शिवसंग्रामने दावा केला आहे. तसा प्रस्ताव भाजपकडे पाठविला असून, दोन वेळा जागा वाटपासंदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती आ. मेटे यांनी दिली.

आधी घटक पक्षांच्या जागा वाटप होतील व उरलेल्या जागांमध्ये 50-50 टक्के जागा भाजप-शिवसेना यांच्यात वाटल्या जातील. त्यामुळे यावेळी घटक पक्षांवर जागा वाटपात अन्याय होणार नाही, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसंग्राम पक्ष यावेळी स्वतःच्या चिन्हावरच निवडणूक लढविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील, विद्यार्थी नेते शैलेस सरकटे आदींची उपस्थिती होती.

भाकरी करपण्यासाठी स्वतः शरद पवारच जबाबदारः मेटे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून नेते इतर पक्षात जात आहे. याला कारण स्वतः शरद पवारच आहेत. नेत्यांवर आधारीत हा पक्ष आहे. आर.आर. पाटील यांच्यानंतर सर्वसामान्य चेहराच पक्षाला देता आला नसल्याचे आमदार मेटे म्हणाले. मी अध्यक्ष असताना राकाँला काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या असे सांगून मेटे यांनी भाकरी करपण्यासाठी स्वतः पवारच जबाबदार असल्याचा आरोपही केला. या वयात त्यांना होत असलेल्या कष्टामुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कोणत्याही पक्षातील नेत्याला दुखःच होईल, असे मेटे यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.  

राजकीय अन्याय झाल्याचे दुखः
भाजपचा मित्र पक्ष व महायुतीचे घटक म्हणून आम्ही 2014 पासून प्रामाणीकपणे काम करतो आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे बहुतांश सामाजिक प्रश्‍नतर सोडविले. मात्र, त्यांना राजकीय आश्‍वासनाची पुर्तता करता आली नाही. आमच्यावर झालेला हा राजकीय अन्यात आहे. त्याचे दुखः असले तरी आम्ही यावेळीही महायुतीचे घटक म्हणून प्रामाणीकपणे काम करीत राहू, असे आ. मेटे यांनी सांगितले. 

आता धनगर, मुस्लीम आरक्षणासाठी लढा
बहुजन समाजातील घटकांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी लढत आलो आहे. मराठा आरक्षणानंतर आता धनगर आणि मुस्लीम आरक्षणासाठीही शिवसंग्राम पक्ष पुढाकार घेईल, असे आ. मेटे यांनी अकोला येथे जाहीर केले.

शिवसंग्रामचे या सामाजिक प्रश्‍नांना प्राधान्य
शेतकरी व शेतमजुरांना पेन्शन, 60 वर्ष पूर्ण करणाऱ्या पुरुष व 55 वर्ष पूर्ण करणाऱ्या महिलांना प्रत्येकी तीन हजार रुपये निवृत्ती वेतनासाठी आग्रही. त्यासाठी साडे तीन लाख अर्ज शिवसंग्रामने गोळा केले असून, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात यासंदर्भातील पाच लाख अर्च मुख्यमंत्र्यांकडे सोपविणार आहे. 

- युवक-युवतींना रोजगार देवू शकले नाही तर किमान पाच हजार रुपये बेरोजगार भत्ता सुरू करण्याची मागणी.
 

- भूमिपूत्रांना स्थानिक नोकऱ्यांमध्ये 80 टक्के जागांवर प्राधान्य देण्यासाठी कायदा करण्याकरिता आग्रही.

- निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsangram claims 12 seats for Assembly Election