मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची साशंकता - रामदास आठवले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

औरंगाबाद - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीबद्दल साशंकता आहे, मात्र दोन्ही पक्षाने युती केली तरच यश मिळेल. युती झाली नाहीच तर रिपाइंचा भाजपला पाठिंबा राहील, असे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वार्तालाप कार्यक्रमात सांगितले.

औरंगाबाद - मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीबद्दल साशंकता आहे, मात्र दोन्ही पक्षाने युती केली तरच यश मिळेल. युती झाली नाहीच तर रिपाइंचा भाजपला पाठिंबा राहील, असे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वार्तालाप कार्यक्रमात सांगितले.

जिल्हा मराठी पत्रकार संघटनेतर्फे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांचा वार्तालाप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार केला. राज्यात भाजपची ताकद वाढली आहे, शिवसेनाही आपल्या ताकदीचा दावा करीत आहे, अशा परिस्थितीत येणाऱ्या जिल्हा परिषद व महापालिकांच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून संघर्ष अटळ आहे; मात्र दोन्ही पक्षाने स्वतंत्र निवडणुका लढल्या तर त्याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. असे झाले तर निवडणुकीनंतर दोन्ही पक्षाला एकत्र यावे लागेल असे भाकीत आठवले यांनी वक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाबासाहेबांच्या विरोधात नाहीत, ते संविधान बदलतील अशी चर्चा करणे चुकीचे आहे, जो कोणी संविधान बदलण्याचा प्रयत्न करेल त्याला आम्हीच बदलून टाकू, असा इशारा त्यांनी दिला. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे, मात्र त्यांना आरक्षण देताना स्वतंत्र देण्यात यावे. मुस्लिम समाजही आरक्षणासाठी मोर्चे काढत आहे, मुस्लिमांच्या अनेक जातींचा आधीच ओबीसी प्रवर्गात समाविष्ट आहे.

त्यामुळे आरक्षण देण्यास काही हरकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रिपब्लिकन ऐक्‍यासाठी दुय्यम स्थान घेण्याचीही आपली तयारी आहे. मात्र अन्य गटांचे नेते आणि कार्यकर्ते ऐक्‍यात येत नाहीत, जे ऐक्‍यात सामील होत नाही त्यांना जनतेने जिल्ह्यात आणि गावात फिरू देऊ नये असे झाले तरच ऐक्‍य शक्‍य असल्याचे ते म्हणाले. ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने यांनी आभार मानले. या वेळी बाबूराव कदम, शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार सतीश पत्की, ऍड. प्रदीप देशमुख, गौतम भालेराव, मिलिंद शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: shivsena-bjp alliance suspected in mumbai municipal