सेनेचा भाजपला ‘चकवा’!

Shivsena-Bjp
Shivsena-Bjp

औरंगाबाद - गेल्या चार वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीमध्ये सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण युतीच्या निर्णयानंतरही थांबलेले नाही. शनिवारी (ता. दोन) महापालिकेतर्फे विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन केले होते. अमरप्रीत चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प उभारणी कामाचे भूमिपूजन झाल्यानंतर शिवसेनेने भाजप पदाधिकाऱ्यांना अचानक ‘चकवा’ दिला. त्यामुळे आमदार अतुल सावे यांना धावपळ करीत खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मागे यावे लागले. सावे यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली; पण कार्यक्रमानंतर दोघांत दिलजमाईही झाली.

लोकसभा व विधानसभा निवडणूक युतीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय झाल्यानंतर नेत्यांमधील भांडणे थांबतील अशी चर्चा होती. मात्र, शनिवारी पुन्हा एकदा खासदार खैरे व आमदार सावे यांच्यात ‘तू तू-मैं मैं’ झाली. अमरप्रीत चौकात बाळासाहेबांचे शिल्प उभारणे व चौकाच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन खासदार खैरे यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आले होते. त्यानुसार आमदार सावे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड दहाच्या सुमारास कार्यक्रमस्थळी आले. खैरे मात्र अकरा वाजता आले. येथील कार्यक्रम संपल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी पुढील कार्यक्रमासाठी संत एकनाथ रंगमंदिरात एसी बसविण्याच्या कामाचे उद्‌घाटन करण्यासाठी या, असा निरोप भाजप पदाधिकाऱ्यांना दिला. 

सावे, कराड, शिवसेनेचे स्थायी समिती सभापती राजू वैद्य रंगमंदिरात पोचले. अर्धा तास वाट पाहिल्यानंतरही खैरेंसह इतर पदाधिकारी त्या ठिकाणी आले नाहीत. त्यामुळे सावे यांनी फोन करून विचारणा केली असता, सेव्हनहिल येथील माहेश्‍वरी समाजाच्या स्वच्छतागृह उभारणीच्या कामाचे भूमिपूजन करण्यासाठी आल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावर सावे संतप्त झाले. त्या कार्यक्रमाचे मलाही निमंत्रण आहे. आम्हाला इकडे पाठवून तुम्ही माझ्या मतदारसंघात गेलात का? अशी विचारणा सावे यांनी केली. त्यावर खैरेंनी सारवासारव करीत, या इकडे, तुम्ही आल्याशिवाय कार्यक्रम सुरू करणार नाही, असे सांगत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. धावत पळत आलेल्या सावे यांनी कार्यक्रमस्थळीदेखील नाराजी व्यक्त केली.

खैरे म्हणतात... आयुक्त अतिहुशार! 
महापालिका आयुक्त व स्थायी समिती सभापती राजू वैद्य यांच्यात काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. त्यावर खासदार खैरे यांनी आयुक्त अतिहुशार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना इथे पाठविले आहे. कोणी काही बोलले तर ते मनावर घेतात. महापालिकेत नगरसेवक नाराजी व्यक्त करीतच असतात. त्यामुळे ते मनावर न घेता काम करा, असे मी त्यांना सांगितले आहे. पुढे आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे आवश्‍यक कामे करून घ्या, असा सल्ला त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com