जिल्हा परिषदेत शिवसेना-कॉंग्रेस सोबत येण्याचे संकेत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

शिवसेनेचा अध्यक्ष, तर कॉंग्रेसचा उपाध्यक्ष होण्याची चर्चा

शिवसेनेचा अध्यक्ष, तर कॉंग्रेसचा उपाध्यक्ष होण्याची चर्चा
औरंगाबाद - पंचायत समित्यांमध्ये "कॉंग्रेस का हाथ शिवसेना के साथ' आल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणाला नवीन वळण लागले आहे. अखेरपर्यंत सत्तेचे पत्ते झाकून ठेवलेल्या शिवसेनेने पंचायत समितीत कॉंग्रेसचा हात धरून सत्तेत जाणे पसंत केले. त्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावला जाण्याची शक्‍यता आहे. जिल्हा परिषदेत आता शिवसेना-कॉंग्रेस सोबत येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. तसे संकेतसुद्धा दोन्ही पक्षांतील स्थानिक नेत्यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे औरंगाबाद पंचायत समिती सभापती, उपसभापतींच्या विजयानंतर कॉंग्रेस नेत्यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांचे कार्यालय गाठून त्यांची भेट घेतली.

जिल्हा परिषदेत भाजपने एक पुरस्कृतसह सर्वाधिक 23 जागा जिंकल्याने त्यांना सत्तेची संधी आहे; मात्र त्यांना शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय पर्याय शिल्लक नाही. शिवसेनेचे 18 सदस्य सोबत आले तर सहज सत्तेत राहता येईल म्हणून, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेला चर्चेसाठी अनेक वेळा टाळी दिली; मात्र शिवसेना नेत्यांनी आपले पत्ते झाकूनच ठेवले.

भाजपसोबत फरपटत जाण्यापेक्षा कॉंग्रेसची साथ घेतलेली बरी असे शिवसेनेने धोरण ठरवत पंचायत समितीत एकमेकांना साथ दिली आहे. आता जिल्हा परिषदेत शिवसेना आणि कॉंग्रेस हे एकत्र येण्याची शक्‍यता आणखी वाढली आहे. शिवसेना 18 आणि कॉंग्रेसचे 16 सदस्य एकत्र आले तर 34 सदस्य होतात. शिवाय राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांनी पाठिंबा दिला तर हा आकडा 37 पर्यंत जाऊ शकतो. संख्याबळाच्या आधारावर शिवसेनेचा अध्यक्ष तर कॉंग्रेसचा उपाध्यक्ष होण्याची शक्‍यता आहे. चार सभापतींपैकी दोन-दोन सभापती दोन्ही पक्ष वाटून घेण्याची चर्चा सुरू आहे.

शिवसेनेच्या भूमिकेमुळे सध्या भाजपचे टेन्शन वाढले आहे. भाजपच्या कोणत्याही प्रस्तावावर शिवसेना प्रतिसाद देण्यास तयार नाही.

शिवसेनेला औरंगाबाद पंचायत समितीत भाजपकडून सभापती पदाची ऑफर देण्यात आली होती; मात्र तीसुद्धा सेनेने नाकारल्याची चर्चा सुरू होती. जिल्ह्यात सत्तेचे वारे वेगळ्याच दिशेने वाहिल्याने आता भाजपला सर्वांत मोठा पक्ष असूनही सत्तेपासून दूर राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे; तरीही भाजपच्या नेत्यांनी सत्तेसाठी अद्यापही प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.

जिल्हा परिषदेत पुन्हा नवीन सत्तेचा पॅटर्न
औरंगाबाद जिल्हा परिषदेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी-मनसे आघाडीचा सत्तेचा नवीन पॅटर्न 2012 मध्ये राज्याला दिला होता. पाच वर्षे या तीन पक्षांची जिल्हा परिषदेत सत्ता राहिली. आता यामध्ये शिवसेना-कॉंग्रेस असा सत्तेचा नवीन फॉर्म्युला तयार होण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादीने पाठिंबा दिला तर यामध्ये राष्ट्रवादीही जोडली जाईल; तर मनसेचा एकमेव सदस्य असून, त्यांनी पाठिंब्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल
भाजप- 22
शिवसेना-18
कॉंग्रेस-16
राष्ट्रवादी-3
मनसे-1
रिपाइं (डी)- 1
अपक्ष (भाजप पुरस्कृत)-1

Web Title: shivsena-congress compramise in zp