ठाकरेंवर माफी मागण्याची वेळ कुणामुळे?

राजेभाऊ मोगल
शनिवार, 28 एप्रिल 2018

नागरिकांनी सुका व ओला कचऱ्याचे वर्गीकरण करावे. प्रसंगी सुका कचरा कंपन्यांना देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. इंदूर येथे कचऱ्यावर कशा प्रकारची प्रक्रिया होते, यासाठी महापौर, जिल्हाधिकाऱ्यांनी तेथे जाऊन पाहणी करावी, अशा सूचनाही डॉ. सावंत त्यांनी दिल्या.

औरंगाबाद - मागील सत्तर दिवसांपासून कचऱ्याचा प्रश्‍न धुमसत आहे. ठिकठिकाणी आजही कचऱ्याचे ढिगारे वाढत असून, अनेक भागात तर कचरा पेटवून देण्याचे प्रकारही सर्रास सुरू आहेत. अशा दुहेरी संकटामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीती व्यक्‍त होत आहे. हा प्रश्‍न वेळीच का सोडविला गेला नाही? पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शहरवासीयांची माफी मागण्याची वेळ कुणामुळे आली, असा प्रश्‍न आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना विचारला असता, त्यांनी "साहेबां'ना मुंबईसह औरंगाबादबद्दल खूप आत्मीयता असल्याचे उत्तर दिले; तसेच दररोज याप्रश्‍नी ते फिडबॅक घेत असल्याचे सांगून वेळ मारून नेली. 

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.27) वाल्मी येथे झाली. यानंतर कचरा प्रश्‍नावर घेतलेल्या बैठकीत महापौर नंदकुमार घोडेले, महापालिकेचे अधिकारी, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडून कचऱ्याच्या सद्य:स्थितीबद्दलची त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. सावंत म्हणाले, की शहरातील कचराकोंडीबद्दल येथील सामान्य नागरिकांप्रमाणेच आम्हाला आणि पक्षप्रमुख ठाकरे यांनाही चिंता आहे. संवेदनशीलता म्हणून हा प्रश्‍न हाताळावा यासाठी ते दररोज फिडबॅक घेतात. येत्या 30 तारखेच्या आत हा प्रश्‍न सोडविण्याचे आदेशच त्यांनी दिलेले असल्याने हा प्रश्‍न कुठल्याही परिस्थितीत सोडवावाच लागेल, असे स्पष्ट केले. 

नागरिकांनी सुका व ओला कचऱ्याचे वर्गीकरण करावे. प्रसंगी सुका कचरा कंपन्यांना देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. इंदूर येथे कचऱ्यावर कशा प्रकारची प्रक्रिया होते, यासाठी महापौर, जिल्हाधिकाऱ्यांनी तेथे जाऊन पाहणी करावी, अशा सूचनाही डॉ. सावंत त्यांनी दिल्या.

Web Title: ShivSena leader Deepak Sawant talked about aurangabad garbage issue