शिवसेनेचे माझा महाराष्ट्र - भगवा महाराष्ट्र अभियान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जून 2019

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण ‘माझा महाराष्ट्र- भगवा महाराष्ट्र’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण जुलै महिना जिल्ह्यात हे अभियान राबवण्यात येणार असल्याचे पक्षाचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शनिवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत सांगितले.

औरंगाबाद - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण ‘माझा महाराष्ट्र- भगवा महाराष्ट्र’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण जुलै महिना जिल्ह्यात हे अभियान राबवण्यात येणार असल्याचे पक्षाचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शनिवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत सांगितले. 

या अभियानांतर्गत जिल्ह्यात शिवसेनेतर्फे पंचायत समितीनिहाय शिवसैनिकांच्या बैठका व मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे, तर शहरी भागात विभागनिहाय बैठका व मेळावे घेण्यात येणार आहेत. शिवसेना नेते तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख आमदार मनीषा कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या या अभियानात ग्रामीण भागात ग्रामपंचायतनिहाय शाखाप्रमुखांच्या नेमणुकांना गती देण्यास सुरवात करण्यात येणार आहे. पीकविमा, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतकऱ्यांचे पीककर्ज यासंदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या, अडीअडचणी जाणून घेऊन कृती कार्यक्रम आखला जाणार आहे. 

असे असेल अभियान 
या अभियानाअंतर्गत १, ७ व २१ जुलैला वैजापूर-गंगापूर विधानसभा मतदारसंघ, ३, ८ व २२ जुलैला गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघ, ४, १५ व २० जुलैला कन्नड व सोयगाव विधानसभा मतदारसंघ, २, ५, १४ व २३ जुलैला औरंगाबाद पश्‍चिम ग्रामीण व शहर विधानसभा मतदारसंघ, ६ व १० जुलैला औरंगाबाद पूर्व मतदारसंघ आणि ९, १३ व २३ जुलैला मध्य मतदारसंघात बैठका व मेळावे होणार आहेत. अभियानादरम्यान शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, संदिपान भुमरे, माजी आमदार आर. एम. वाणी, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, सहसंपर्कप्रमुख अण्णासाहेब माने, त्र्यंबक तुपे,  सुहास दाशरथे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे; तसेच मंगळवारी (ता.२३) शहर व जिल्ह्यातील महिलांसाठी जिजाऊ कवच योजना, गुरुवारी (ता.२५) इयत्ता ८ वी, १० वी ते पदवीधर युवतींसाठी स्वसंरक्षण शिबिर, सोमवारी (ता.२९) विद्यार्थी जनजागरण मोहिमेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन आणि बुधवारी (ता.३१) भूमिपुत्र रोजगार मोहीम या मुख्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena Majha Maharashtra Bhagava Maharashtra Campaign Ambadas Danave Politics