कन्हैयाकुमारच्या परभणी व पाथरी येथील सभेला शिवसेनेचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

कन्हैयाकुमारवर राष्ट्रद्रोहाचे आरोप झाले आहेत. त्यामुळे, कन्हैयाकुमारच्या सभेला शिवसेनेच्यावतीने विरोध दर्शविण्यात आला आहे. या संदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधिक्षकांची भेट घेऊन सभेला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे.

परभणी-  कन्हैयाकुमारवर राष्ट्रद्रोहाचे आरोप झाले आहेत. त्यामुळे, कन्हैयाकुमारच्या सभेला शिवसेनेच्यावतीने विरोध दर्शविण्यात आला आहे. या संदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधिक्षकांची भेट घेऊन सभेला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे.

कन्हैयाकुमार यांची शनिवारी (ता.25) पाथरी व परभणी येथे दोन सभा होणार आहेत. या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. पाथरीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी या सभेसाठी आता पर्यत दोन बैठका देखील घेतल्या आहेत. आता शिवसेनेच्यावतीने कन्हैयाकुमारच्या सभांना विरोध दर्शविण्यात येत आहे.

कन्हैयाकुमार यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप आहे. त्यांच्या या दोन्ही सभा सामाजिक सलोखा बिघडून टाकण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सामाजिक सलोखा बिघडविण्यासाठीच या सभा आयोजित केल्या असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

बुधवारी (ता.22) शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉ. संजय कच्छवे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यासह पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांची भेट घेतली. त्यांना कन्हैयाकुमार यांच्या सभाना परवानगी देऊ नये अशी विनंती करणारे निवेदन दिले आहे. कन्हैया कुमार हे सामाजिक सलोखा बिघडविणारे, चिथावणीखोर वक्तव्य करणारे आहेत. त्यांच्या भाषणामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या सभांना आमचा विरोध राहील असेही जिल्हा प्रमुख डॉ.कच्छवे यांनी पोलिस अधिक्षकांना सांगितले आहे.

Web Title: ShivSena oppose to Kanhaiya Kumars Parbhani and Pathri rally