शिवसेनेने मैदानावर पळवले क्रीडा अधिकारी

आदित्य वाघमारे
बुधवार, 30 मे 2018

विभागीय क्रीडा संकुलातील अॅथलेटिक्स ट्रॅकवर मातीचे साम्राज्य आहे. या ट्रॅकवर धावणाऱ्या खेळाडूंना नाकावर रुमाल बांधून पाळावे लागते आहे. हे कळाल्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता. 30) संकुलात धाव घेतली.

औरंगाबाद - मैदानावरील माती उडत असल्याने तोंडावर रुमाल बांधून खेळाडू पळत असल्याचे कळल्यावर शिवसेना कार्यकर्त्यांनी विभागीय क्रीडा संकुलात पुन्हा धडक दिली. मातीमय मैदानावर पळून दाखवा सांगत जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी क्रीडा अधिकाऱ्यांना ट्रॅकवर धावायला लावले. 

विभागीय क्रीडा संकुलातील अॅथलेटिक्स ट्रॅकवर मातीचे साम्राज्य आहे. या ट्रॅकवर धावणाऱ्या खेळाडूंना नाकावर रुमाल बांधून पाळावे लागते आहे. हे कळाल्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता. 30) संकुलात धाव घेतली. सलग तिसऱ्यांदा गेल्यावरही उपसंचालक राजकुमार महादवाड भेटले नाहीत त्यामुळे त्यांच्या कार्यालयाला शिवसैनिकांनी कुलूप ठोकले आणि नंतर उघडलेही. कँटीनमध्ये जात शिवसैनिकांनी डायट चार्ट नुसार अन्न नसल्याचे आढळल्यावर कँटीन चालकाची कान उघडणी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केली. त्यानंतर मैदानावर पाणीच मारले नसल्याने येथील ट्रॅक उखडला आहे. भुसभुशीत झालेल्या मैदानावर अर्धपोटी खेळाडूंनी कसे पळावे हे दाखवा असे सांगत शिवसेनेने क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे आणि वॉर्डन सुनील वानखेडे यांना मैदानावर पाळायला लावले. यावेळी शहरप्रमुख विजय वाघचौरे, राजेंद्र दानवे, नरेश भालेराव, राजू वाकुडे, शिल्परणी वाडकर, नंदू लबडे आदींची उपस्थिती होती. 

क्रीडा उपसंचालक अनुपस्थित -
क्रीडा उपसंचालक राजकुमार महादावाड हे बुधवारी (ता. 30) अनुपस्थित होते. आजारी असल्याने ते कार्यालयात आले नसल्याचे क्रीडा अधिकाऱ्यांनी निरोप दिला. त्यानंतर येथील अडचणींचा पाढा अंबादास दानवे यांनी विभागीय संकुल समिती अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर, क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कानावर घातला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Shivsena took action against players inconvenience at Aurangabad