बॅंकांच्या "करन्सी चेस्ट'मध्ये पैशांचा तुटवडा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

औरंगाबाद - गेल्या आठ नोव्हेंबरला अमलात आलेल्या नोटबंदीचा वेगवेगळ्या क्षेत्रांवर आता परिणाम दिसू लागला आहे. यादरम्यान तब्बल जानेवारी 2017 पर्यंत बॅंक खातेधारकांना पैसे मिळविण्यासाठी पहाटेपासून रांगा लावाव्या लागल्या होत्या. यानंतर 13 मार्चला एटीएम व बॅंकांतून पैसे काढण्याची मर्यादा रिझर्व्ह बॅंकेने संपुष्टात आणली. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून बॅंकांच्या करन्सी चेस्ट रिकाम्या होण्यास सुरवात झाली. 

औरंगाबाद - गेल्या आठ नोव्हेंबरला अमलात आलेल्या नोटबंदीचा वेगवेगळ्या क्षेत्रांवर आता परिणाम दिसू लागला आहे. यादरम्यान तब्बल जानेवारी 2017 पर्यंत बॅंक खातेधारकांना पैसे मिळविण्यासाठी पहाटेपासून रांगा लावाव्या लागल्या होत्या. यानंतर 13 मार्चला एटीएम व बॅंकांतून पैसे काढण्याची मर्यादा रिझर्व्ह बॅंकेने संपुष्टात आणली. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून बॅंकांच्या करन्सी चेस्ट रिकाम्या होण्यास सुरवात झाली. 

राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की नोटाबंदीदरम्यान आम्ही नागपूर, पुणे आणि मुंबईसारख्या ठिकाणांहून पैशांची व्यवस्था केली होती. यादरम्यान पैसे काढण्यासही मर्यादा असल्याने बॅंकांना पैसे पुरवून पुरवून वापरता आले. आता पैसे काढण्याची मर्यादा संपुष्टात आल्यापासून शहरातील राष्ट्रीयीकृत, खासगी आणि सहकारी बॅंकांच्या खातेधारकांची मागणी वाढली आहे. रोख रक्‍कम खातेधारकांच्या तिजोऱ्यात गेल्याने बॅंकांच्या तिजोऱ्या रिकाम्या झाल्या. रिझर्व्ह बॅंकेकडून पतपुरवठा न झाल्यास येत्या काळात आर्थिक परिस्थिती भीषण होऊ शकते. शहरामध्ये बॅंक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया आणि एचडीएफसीच्या करन्सी चेस्ट आहेत. खासगी बॅंका आपल्या ग्राहकांसाठी सध्या पुणे, मुंबईहून पैशांची व्यवस्था करताहेत; मात्र राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या तिजोऱ्या अद्यापही रिझर्व्ह बॅंकेकडे मोठ्या अपेक्षेने पाहताहेत. 

एटीएम पुन्हा रिकामे होण्याची शक्‍यता 

एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात चारशे बॅंकांचे सातशेपैकी साडेसहाशेच्या आसपास एटीएम रिकामे होते. त्यानंतर बॅंकांनी रहाटगाडा चार ते पाच दिवस लोटला. यादरम्यान एसबीआयच्या करन्सी चेस्टला शंभर कोटी रुपये आलेले होते; मात्र ते संपल्यात जमा असल्याने पुन्हा आजपासून (गुरुवार, ता. 20) एटीएम रिकामे होण्याची भीती व्यक्‍त होत आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने पैसे काढण्याची मर्यादा संपुष्टात आणली असली तरीही अघोषित मर्यादा कायम सुरू आहे. 

...तर ग्राहकांना फटका 
राष्ट्रीयीकृत, खासगी आणि सहकारी बॅंकांच्या खातेधारकांना आपल्या स्वत:च्या बॅंकेच्या एटीएममध्ये पैसे नसल्याने नाईलाजास्तव अन्य बॅंकांच्या एटीएममधून पैसे काढावे लागतात. त्यामुळे मर्यादेहून अधिक वेळा इतर बॅंकांच्या एटीएममधून पैसे काढलेल्यामुळे अतिरिक्‍त 20 ते 30 रुपये भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागतोय; मात्र पैसे मिळताहेत म्हणून खातेधारक मिळेल त्या एटीएममधून पैसे काढत आहेत. याबद्दल एटीएमधारकांतून बॅंक अधिकाऱ्यांकडे रोषही व्यक्‍त होतोय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shortage of money