राष्ट्रीयीकृत बॅंकांत एटीएम कार्डचा तुटवडा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे जात असताना क्रेडिट/डेबिट कार्डला प्रामुख्याने राष्ट्रीयीकृत बॅंकांत मागणी वाढलेली आहे. मात्र, खातेधारकांना देण्यासाठी बॅंकांकडे पुरेसे एटीएम कार्ड नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे बहुतांश राष्ट्रीयीकृत बॅंकांतील खातेधारक एटीएम कार्डची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. 

औरंगाबाद - कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे जात असताना क्रेडिट/डेबिट कार्डला प्रामुख्याने राष्ट्रीयीकृत बॅंकांत मागणी वाढलेली आहे. मात्र, खातेधारकांना देण्यासाठी बॅंकांकडे पुरेसे एटीएम कार्ड नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे बहुतांश राष्ट्रीयीकृत बॅंकांतील खातेधारक एटीएम कार्डची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. 

राष्ट्रीयीकृत, खासगी आणि सहकारी बॅंकांच्या माध्यमातून रुपे, मास्टर आणि व्हिसा कार्ड वितरित केले जातात. प्रामुख्याने रुपे कार्ड हे डेबिट असून राष्ट्रीयीकृत आणि ग्रामीण, तर बहुतांश व्हिसा व मास्टर कार्ड खासगी व परकीय बॅंकांच्या खातेधारकांसाठी दिले जातात. या कार्डद्वारे खरेदी-विक्रीचे व्यवहार केल्यास अडीच टक्‍क्‍यांपर्यंत अतिरिक्‍त सरचार्ज लागतो. त्यामुळे 90 टक्‍क्‍यांहून अधिक खातेधारक एटीएममधून पैसे काढण्यासाठी या कार्डचा वापर करतात. 

नोटाबंदीनंतर ऑनलाईन बॅंकिंग व्यवहारांमध्येही वाढ होत असल्याने डेबिट अथवा क्रेडिट कार्डची मागणी वाढलेली आहे. मात्र, बॅंकांकडे या मागणीच्या तुलनेत पुरवठा करणारी यंत्रणा कमकुवत असल्याने खातेधारकांना दिलेल्या मुदतीत कार्ड उपलब्ध होत नाही. परिणामी, ज्या बॅंका हातोहात एटीएम देतात, त्याठिकाणी बॅंकांत कार्ड आल्यावर लगोलग खातेधारक एटीएम घेऊन जाताना दिसत आहेत. त्यामुळे आठवडा ते दहा दिवसांमध्ये मिळणाऱ्या एटीएम कार्डला महिना उजाडत आहे. त्यामुळे बॅंक खातेधारक त्रस्त झाले आहेत. 

पुन्हा नोटांची चणचण 
नोटाबंदीनंतरच्या काळात औरंगाबादमधील सर्व बॅंकांमध्ये नोटांचा तुटवडा जाणवत होता. सरकारने दिलेल्या मर्यादेपेक्षाही कमी रक्‍कम खातेधारकांना हाती घेऊन जावे लागत होते. हे चित्र आता बदलले आहे. मात्र, सोमवारी (ता. सहा) बॅंका उघडल्यानंतर पुन्हा एकदा नोटांचा तुटवडा जाणवत असल्याचे दिसून आले. याबाबत सूत्रांनी सांगितले, की सध्या पाचपैकी तीन करंसी चेस्टमध्ये ठणठणाट आहे. केवळ एसबीआय आणि एसबीएचमध्ये पुरेसे पैसे आहेत. उर्वरित बॅंकांना अन्य ठिकाणांहून रोकड मागवावी लागत आहे. 

मागणीच्या तुलनेत एटीएम कार्ड पुरविणारी यंत्रणा अपुरी ठरत आहे. त्यामुळे दहा दिवसांऐवजी खातेधारकांना एटीएम कार्ड मिळण्यास एक-एक महिना लागतोय. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने खातेधारकांना एटीएम मिळण्यास विलंब होतोय. 
- रवींद्र धामणगावकर, सचिव, एसबीएच स्टाफ असोसिएशन 

Web Title: Shortage of nationalized banks ATM card