सोशल मीडियातील पोस्टवरून शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

औरंगाबाद - सोशल मीडियावर शासनाविरोधात अतिरंजित पोस्ट टाकल्यावरून जिल्हा परिषदेच्या सीईओ पवनीत कौर यांनी एका शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ग्रामविकासमंत्री व सचिवांच्या फोटोसह विनापरवानगी पोस्ट टाकल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, आपल्याला निलंबित का करण्यात येऊ नये, असे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. 

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीवरून शहरात मोर्चा काढण्यात आला होता. यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि सचिव असीमकुमार गुप्ता यांच्याशी झालेल्या भेटीचा संदर्भ घेऊन शासन धोरणाच्या विरोधात शिक्षकांना भडकाविणाऱ्या पोस्ट व्हायरल करण्यात आल्या होत्या. या पोस्ट ओहर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक संतोष ताठे यांनी केल्याचा आरोप आहे. अतिरंजित पोस्ट मंत्री व अधिकाऱ्यांच्या छायाचित्रांसह व्हायरल करताना संबंधित शिक्षकाने परवानगी घेतलेली नाही. ही बाब महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियमानुसार गंभीर गुन्हा ठरते, असे नोटिशीत म्हटले आहे. ग्रामविकास मंत्रालयाने जिल्हा परिषद सीईओ यांना यासंदर्भात ई-मेलद्वारे माहिती कळविली होती. त्यानुसार सीईओंनी शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आपणास सेवेतून निलंबित का करण्यात येऊ नये, याबाबत सात दिवसांत गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत खुलासा करावा, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. 

ही पोस्ट शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी टाकण्यात आली होती. मंत्री अथवा अधिकारी यांचा अवमान होईल, असा हेतू नव्हता. याबाबत गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत खुलासा करणार आहे. 
-संतोष ताठे, शिक्षक. 

Web Title: Show cause notices to teacher on social media post