बेटीची कमाल अन्‌ कोटीची धमाल!

संभाजी रा. देशमुख
शनिवार, 15 एप्रिल 2017

काल बॅंक अधिकाऱ्यांनी माझ्या आई-बाबांना एक कोटीचे बक्षीस लागल्याचे सांगितले. त्यामुळे आज मोदीजींची भेट कधी होईल, याचीच ओढ होती. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली, तेव्हाच कोट्यवधी रुपये मिळाल्याचा आनंद मला झाला

लातूर : ''बाबांकडे हट्ट धरून मोबाईल घेतला, तोही हप्त्यांवर. त्याचेही अजून पाचच हप्ते झाले. तेवढ्यात परवा बॅंकेतील अधिकाऱ्यांचा फोन आला. सुरवातीला धडकीच भरली; पण हिंमत करून फोन घेतला, तर त्यांनी एवढेच सांगितले की, शुक्रवारी (ता. 14) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी नागपूर येथे कुटुंबासह जायचे आहे!

काल बॅंक अधिकाऱ्यांनी माझ्या आई-बाबांना एक कोटीचे बक्षीस लागल्याचे सांगितले. त्यामुळे आज मोदीजींची भेट कधी होईल, याचीच ओढ होती. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली, तेव्हाच कोट्यवधी रुपये मिळाल्याचा आनंद मला झाला...'' श्रद्धा मेंगशेट्टे भरभरून बोलत होती.

एक कोटी रुपये मिळाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर झळकत होता. तथापि, एक कोटीपेक्षा जास्त आनंद पंतप्रधानांना भेटल्याचा आहे, अशी प्रांजळ प्रतिक्रियाही श्रद्धाने 'सकाळ'कडे व्यक्त केली. 

आई मीरा आणि वडील मोहन यांची श्रद्धा ही मोठी मुलगी. श्रद्धाला खूप शिकवायचे, इंजिनिअर करायचे या एका स्वप्नासाठीच तिला पुणे येथील महाविद्यालयात गेल्या वर्षी प्रवेश दिला. लातूर शहरातील जुन्या गावाच्या खंडोबा गल्लीत छोटेखानी घर आणि तेथून जवळच किराणा मालाचे वडिलांचे दुकान, असे चाकोरीबद्ध जीवन जगताना दोघांनी मुलीला खूप शिकवायचे एवढेच स्वप्न पाहिले. त्यामुळे तिला सतत नवनवीन अत्याधुनिक बाबी मिळाव्यात, यासाठी कुटुंब धडपडायचे. त्यात श्रद्धाचा ओढाही अभियांत्रिकीकडे. त्यामुळे तिला पुणे येथे 'एआयएसएसपीएम' महाविद्यालयात गेल्या वर्षी प्रवेश दिला. तिने दिवाळीत हट्ट केला म्हणून तिला नवीन मोबाईल घेण्यास सांगितले. तेही 1590 रुपयांच्या हप्त्यावर!

परवा 'एसबीआय'च्या बॅंक अधिकाऱ्यांचा फोन आला आणि आम्हा कुटुंबीयांना नागपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी जायचे आहे, असे सांगितले तेव्हा विश्‍वासच बसला नाही. दोन-दोनदा खातरजमा करून आम्ही नागपूरला निघालो. काल सायंकाळी बॅंकेच्या उच्च अधिकाऱ्यांनी डिजिधन लकी ग्राहक योजनेतून श्रद्धाला एक कोटीचे बक्षीस मिळाल्याचे सांगितले, तेव्हाही सुरवातीला विश्‍वासच बसला नाही. एक कोटी रुपये आणि सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होईल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते.

श्रद्धाचा स्वभाव आणि तिची शिक्षणासाठीची धडपड पाहून तिचा अभिमान वाटत होता, आता तिच्या पावलाने घरात समृद्धीही आली. बेटीने कमाल केली अन्‌ घरी कोटीची धमाल झाली, अशा भावना मोहन मेंगशेट्टे यांनी व्यक्त केल्या. 

एक कोटीपेक्षा जास्त आनंद पंतप्रधानांना भेटल्याचा आहे. 
- श्रद्धा मेंगशेट्टे

Web Title: Shraddha Mengshette from Latur wins 1 Cr in PM Narendra Modi's Dhigi Dhan Yojana