bibtya
bibtya

आजारी बिबट्यास जीवदान पण

नांदेड : जिल्ह्यात वन्यप्राणी भूक भागविण्यासाठी मानवी वस्त्यांकडे धाव घेत असल्याचा प्रकार गुरुवारी (ता. २१) माळकौठा (ता. मुदखेड) येथे आढळून आलेल्या आजारी बिबट्यावरुन समोर आला आहे. येथील विठ्ठल शिंदे यांच्या शेतात आजारपणामुळे ग्लानी आलेला बिबट्या आढळल्याची माहिती श्री. शिंदे यांनी वनविभागास कळविली. त्यानुसार वनविभागाने आजारी बिबट्यास पिंजऱ्यामधून उपचारार्थ सुरक्षीत स्थळी हलवून नंतर दोन दिवस उपचार झाल्यानंतर बिबट्यास शनिवारी मध्यरात्री निसर्गात सोडून देण्यात आले. मात्र असे असले तरी आजारपणाचे कारण गुलदस्त्यात आहे. 

जिल्ह्यातील वनक्षेत्रामधील वन्यप्राणी इतरत्र वावर करत असल्याने भक्षाच्या शोधात शिकारी वन्यप्राणी नागरिकांच्या नजरेस पडतात. त्यातूनच अनेकवेळा भक्षाच्या शोधात वन्यप्राण्यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याने हल्ल्याचे प्रकार घडतात. मुदखेड तालुक्यातील माळकौठा शिवारामध्ये गुरुवारी असाच आजारपणामुळे ग्लानी आलेला बिबट्या येथील विठ्ठल शिंदे यांना शेतात आढळून आला. दरम्यान, बिबट्याची हालचाल लक्षात घेवून श्री. शिंदे यांनी तत्काळ वनविभागास माहिती दिली. 

प्राप्त माहितीनुसार वनविभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, सहाय्यक वनसंरक्षक डी. एस. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीपाद कवळे यांच्यासह वन्यजीव अभ्यासकांची टीम घटनास्थळावर दाखल झाली. दरम्यान, लाइन पॉयझनिंगचा अंदाज घेऊन आजारी बिबट्यास पिंजरा लावून उपचारार्थ वनविभागाच्या कार्यालयामध्ये हलवले. आजारी बिबट्यावर दोन दिवस उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यास शनिवारी (ता.२३) मध्यरात्री सुरक्षीत स्थळी जंगलामध्ये निसर्गापण करण्यात आले. आजारी बिबट्यावर डॉ. रत्नपारखी, डॉ. काटकमवार, डॉ. बिलोलीकर, श्री. पोलावार, श्री. चव्हाण यांनी उपचार केले.

आजारपणाचे कारण गुलदस्त्यात

माळकौठा शिवारात आढळलेल्या आजारी बिबट्यावर वनविभागामध्ये डॉक्टरांकडून योग्य उपचार करण्यात आले. मात्र, बिबट्याच्या आजाराचे कारण फॉरेन्सिक विभागाच्या अहवालानंतरच समोर येणार असल्याने सध्यातरी बिबट्याच्या आजारपणाचे कारण गुलदस्त्यात आहे.  

अफवा पसरु नये

मानवी वस्तीजवळ बिबट्या आला किंवा दिसला म्हणून त्याला पकडण्याची आवश्यकता आहे, असा निकर्ष काढता येत नाही. मांसभक्षी प्राणी स्वरक्षणासाठी हल्ला करू शकतात. त्यामुळे ते डिवचले जाणार नाहीत, याची काळजी घावी. सर्वात महत्त्वाचे अफवा पसरवू नये व वन विभागाला सहकार्य करावे. 
आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक, नांदेड.


सुरक्षितता बाळगावी


ज्या क्षेत्रात बिबट्याचा वावर असेल, अशा ठिकाणी पहाटे किवा सायंकाळी शेतात, जंगलात प्रवेश करु नये. गोठे पक्के करावे व गोठ्यांना पक्की कुलूप बंद दारे असावीत. शक्यतो पशुधन संध्याकाळी गावात आणून बांधावीत. शेतात रात्री थांबणे जरुरी असल्यास दोघा - तिघांनी मिळून राहावे व जाळ करावा. उघड्यावर, शेतात किंवा जंगलात प्रातःर्विधीसाठी जाऊ नये. एकट्याने शेतात किवा जंगलात जाणे टाळावे. प्रसंग पडल्यास रेडिओ किवा मोबाईलवर मोठ्याने गाणी लावावीत. सोबत काठी असावी. 
डी. एल. पवार, सहाय्यक वनसंरक्षक. 

बिबट्या हा निशाचर

बिबट्या हा निशाचर, लाजरा व शक्यतो माणसाला टाळणारा प्राणी आहे. माणूस हे त्याचे भक्ष नाही. सहसा तो मानवावर हल्ला पण करीत नाही. चार पायाचे खूर असणारे प्राणी बिबट्याचे भक्ष असतात. बिबट्याचे आवडते खाद्य कुत्रे व डुकरे आहेत. ज्या जंगललगतच्या गावामध्ये घाण व उकरडे असतात, तिथे कुत्र्या व डुकरांची संख्या अधिक असते. यामुळे बिबट्यासारखा प्राणी त्या गावालगत आकृष्ट होतो. अशा प्रकारची गावे बिबट्याच्या अधिवासास पोषक असतात. त्यामुळे वन्य जीवापासून सुरक्षिततेसाठी आपला परिसर व गाव स्वछ ठेवावे. 
अतिंद्र बी. कट्टी, मानद वन्य जीवरक्षक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com