आयुष्यभर खस्ता, कुटुंब उद्‌ध्वस्त!

मनोज साखरे
मंगळवार, 30 जुलै 2019

अमली पदार्थांच्या आहारी समाजातील अनेक घटक जात आहेत. त्यात तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे आयुष्याला खस्ता बसत असून, कुटुंबही उद्‌ध्वस्त होत आहेत. 

औरंगाबाद - 'संगत बिघडली की गुणही बिघडतात हे काही खोटे नाही,' याची अनेक उदाहरणे समाजात दिसतात. कुसंगती, गरिबी, बेरोजगारी, शिक्षण, मूल्यशिक्षणाचा अभाव व बदलती जीवनपद्धती यामुळे अमली पदार्थांच्या आहारी समाजातील अनेक घटक जात आहेत. त्यात तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे आयुष्याला खस्ता बसत असून, कुटुंबही उद्‌ध्वस्त होत आहेत. 

देशात अमली पदार्थांचा काळाबाजार सातत्याने होत आला आहे. हेरॉईन, कोकेन आदी महागड्या अमली पदार्थांसोबतच काही बंदी आणण्यात आलेल्या ड्रग्जची तस्करीही देश-विदेशांतून सुरू आहे. या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल होते; परंतु या पदार्थांचे व्यसन जडलेले देशातील असंख्य नागरिक व त्यांची कुटुंब उद्‌ध्वस्त होत आहेत. व्यसनाधिनतेमुळे असंख्य संसार मोडले गेले; कौटुंबिक कलह, समस्या व गरिबीत आणखीनच भर पडून आत्महत्येचेही प्रकार घडत आहेत. 
 
यामुळे नशेखोरीची लागण 

 •  मूल्यशिक्षण व उच्च दर्जाच्या शिक्षणाचा अभाव. 
 •   भोवतालचे पोषक नसलेले सामाजिक वातावरण. 
 •   शिक्षणात अपयश, गरिबी, बेरोजगारी. 
 •  विकास व प्रगत समाज जीवनापासून वंचित 
 •   शासन व त्यांच्या योजना अशा कुटुंबापर्यंत न पोचणे. 
 •  चैन, विलासी, बदलत्या जीवनपद्धतीचा अंगीकार. 
 •  झटपट पैशांसाठी प्रयत्न, असंगती, अपेक्षाभंग, नैराश्‍य. 

 
हे आहेत अमली पदार्थ 
कोकेन, मेथाएम्फेटामीन, रिटालीन, साइलर्ट, इन्हेलंट, हेरॉईन, मार्फीन, गांजा, अफू, मद्य यासह विविध नशा व गुंगीकारक ड्रग्ज. शिवाय विविध प्रकारचे मद्य, हातभट्टी, गावठी दारू, ताडी, भांग यांचाही नशाकारक पदार्थांमध्ये समावेश होतो. 
 

एका अहवालानुसार देशातील स्थिती 

 •  देशात 16 कोटी व्यक्ती मद्यसेवन करतात. 
 •  10 ते 75 वयोगटातील 14.6 टक्के व्यक्ती मद्यपान करतात. 
 •   27.3 टक्के पुरुष व 1.6 टक्के महिला व 1.3 टक्के मुले मद्यपान करतात. 
 •   30 टक्के देशी व 30 टक्के विदेशी मद्यपानाचे प्रमाण. 
 •  उर्वरित 40 टक्के याशिवाय स्थानिक पातळीवर विविध प्रकारचे मद्य व अमली पदार्थांचे सेवन. 
 •  इंजेक्‍शनद्वारे महाराष्ट्रात 44 हजार 323 व्यक्ती ड्रग्ज घेतात. 
 •  देशात हेच प्रमाण आठ लाख 54 हजार 296 एवढे आहे. 
 •  महाराष्ट्रात 10.2 टक्के व्यक्ती मद

 
औरंगाबादची स्थिती 
शहरातील जिन्सी, किराडपुरा, कटकटगेट, बेगमपुरा, नारेगाव, मुकुंदवाडी, राजनगर, हर्सूल व इतर भागांत विविध अमली पदार्थांची तस्करी होते. आंध्रप्रदेश व इतर राज्यांतून व शहरातून ड्रग्ज व इतर अमली पदार्थ शहरात येतात. बसने, तर कधी खासगी वाहनांनीही ड्रग्जची वाहतूक होते. गांजा, अफू व इतर मद्यप्रकारांची तस्करी होते; परंतु हेरॉईन, कोकेन अशा महागड्या पदार्थांची तस्करी छुपी असून ती कमी आहे. नशेखोरीमुळे शहरात घातपाताचे व कायदा व सुव्यवस्थेला तडा गेल्याचे प्रकार उघड झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: side effects of intoxication