तीस लाखांचा नंबर गेम 

माधव इतबारे
मंगळवार, 21 मे 2019

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महापालिकेने शहर बस सुरू केली असली तरी बस थांब्याची दैना मात्र अद्याप संपलेली नाही. काही दिवसांपूर्वी सुमारे तीस लाख रुपये खर्च करून बस थांब्याजवळ साईन बोर्ड लावण्यात आले आहेत.

औरंगाबाद - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महापालिकेने शहर बस सुरू केली असली तरी बस थांब्याची दैना मात्र अद्याप संपलेली नाही. काही दिवसांपूर्वी सुमारे तीस लाख रुपये खर्च करून बस थांब्याजवळ साईन बोर्ड लावण्यात आले आहेत. या साईन बोर्डवर बस थांब्याचे नाव व क्रमांक टाकण्यात आले आहेत. हे क्रमांक नेमके काय दर्शवितात हेच कळत नसल्यामुळे प्रवाशांसह नागरिकही बुचकळ्यात पडले आहेत. 

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुमारे 36 कोटी रुपये खर्च करून महापालिकेने शहर बस सेवा सुरू केली आहे. महापालिकेने 100 बस खरेदी केल्या असल्या तरी रस्त्यावर पूर्णपणे बस उतरलेल्या नाहीत. तीन टप्प्यात बस पुरवठा करण्याचे आश्‍वासन टाटा कंपनीने महापालिकेला दिले होते. मात्र 19 बस अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. तसेच 32 बसची पासिंगच बाकी आहे तर केवळ 36 बस रस्त्यावर धावत आहेत. 23 जानेवारीपासून बस सेवा सुरू झाली. चार महिन्यानंतरही महापालिका व एसटी महामंडळाला संपूर्ण बसचे नियोजन करण्यात अपयश आले आहे. महापालिकेने सुरू केलेल्या बस स्मार्ट असल्या तरी बस थांब्यावरचे उकिरडे मात्र कामय आहेत. अनेक ठिकाणी अद्याप साफसफाईदेखील करण्यात आलेली नाही. प्रवशांना उन्हात उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बस थांब्याच्या शेजारी साईनबोर्ड लावण्यात आले आहेत. साईनबोर्डवर 16 रकाने असून, त्यात क्रमांक टाकण्यात आले आहेत. मात्र हे क्रमांक कशाचे याचा उलगडा होत नाही. या कामावर तब्बल 30 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. एवढी मोठी रक्कम खर्च करून महापालिका कोणता नंबर गेम खेळत आहेत? असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sign boards in aurangabad