बहिणीशी फोनवर बोलतानाच  त्याची रेल्वेखाली आत्महत्या

मनोज साखरे
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

शिवाजीनगर रेल्वेमार्गावरील घटना, मृत भेळपुरी विक्रेता 

औरंगाबाद - भेळपुरीची हातगाडी बंद करुन तो दुचाकीने शिवाजीनगर येथील रेल्वेगेटजवळ गेला. रेल्वे रुळावर उभे राहून बहिणीला फोनही केला. ""रेल्वे रुळावर उभा असून आत्महत्या करत असल्याचेही तो तिला म्हणाला.'' परंतु, भाऊ विनोद करतोय असेच बहिणीला वाटले अन्‌ तेवढ्यात धाडधाड रेल्वे आली आणि मोठ्ठा आवाज झाला. भाऊ खरे बोलत होता हे लक्षात आले पण तोपर्यंत सारे काही संपले होते. ही गंभीर घटना 26 ऑगस्टला रात्री सव्वाबाराच्या सुमारास उघडकीस आली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, संजय रामदास बोटाले (वय 43, रा. जाधववाडी, हडको) असे मृत भेळपुरी विक्रेत्याचे नाव आहे. शहरतील प्रोझोन मॉलसमोर भेळपुरीचा गाडा लावून संजय बोटाले उदरनिर्वाह करीत होते. 26 ऑगस्टला रात्री गाडा बंद करुन ते दुचाकीने शिवाजीनगरातील रेल्वेगेटजवळ गेले. तेथून काही अंतरावर त्यांनी रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी बहीणीला फोन केला होता. बहीणीला आत्महत्येचा प्रकार समजल्यानंतर तिने जवाहरनगर पोलिसांना कळविले. रात्री सव्वाबाराच्या सुमारास ही घटना स्पष्ट झाली.

त्यानंतर जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनस्थळी पाहणी केली असता बोटाले यांची दुचाकी, डायरी व मोबाईल पोलिसांना मिळाला. मोबाईलवरुन त्यांनी नातेवाईक महादू आदमाने यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर बोटाले यांना घाटी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. त्यांचा मुलगा आठवीत, मुलगी अकरावीत शिक्षण घेत आहेत. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद जवाहरनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली. तपास हवालदार मनोज अकोले करीत आहेत. 

बघ आवाज येतो का... 
आत्महत्येपूर्वी भाऊ विनोद करीत असल्याचे बहीणीला वाटले परंतु संजय बोटाले यांनी बघ रेल्वेचा आवाज येतो का, असा प्रश्‍न केला त्यानंतर तो गंभीरपूर्वक बोलत होता. रेल्वेचा आवाज आल्याने व बोटाले यांचे स्वर ऐकून बहीणही गंभीर झाली, परंतु क्षणार्धात रेल्वेने संजय बोटाले यांचा चुराडा केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sister commits suicide while talking on the phone