सीताराम सुरे यांच्यासह विद्यार्थ्यांची जामिनावर मुक्तता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

औरंगाबाद - अभियांत्रिकी परीक्षेचे पेपर शिवसेना नगरसेवकाच्या घरात सोडविल्याच्या प्रकरणातील साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष, प्राचार्य, प्राध्यापक, परीक्षा केंद्रप्रमुख आणि सदस्य अशा पाच जणांना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी (इन्चार्ज कोर्ट) एस. बी. साबळे यांनी गुरुवारपर्यंत (ता. २५) वाढीव पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले; तर सीताराम सुरेंसह विद्यार्थी, अशा २४ जणांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर जामिनावर मुक्त केले. या गुन्ह्यातील तीन विद्यार्थिनी व एका विद्यार्थ्याची यापूर्वीच जामिनावर मुक्तता झाली आहे. 

साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पेपर शिवसेना नगरसेवक सुरे यांच्या घरात सोडवले जात असताना पोलिसांनी छापा मारला होता. या प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी (ता. २३) प्रा. विजय आंधळे, संस्था चालक सदस्य मंगेश मुंढे, संस्थेचे अध्यक्ष ॲड. गंगाधर मुंढे, परीक्षा केंद्रप्रमुख प्रा. अमित कांबळे आणि प्राचार्य संतोष देशमुख यांच्यासह २४ विद्यार्थ्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपास अधिकारी तथा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश वानखेडे आणि विशेष सहायक सरकारी वकील सय्यद शहनाज यांनी न्यायालयास विनंती केली की, घरमालक सुरे यांच्यासह २४ आरोपी विद्यार्थ्यांची सध्या विचारपूस पूर्ण झाल्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर करावी. उर्वरित पाच जण हे गैरप्रकार घडलेल्या संस्थेशी संबंधित महत्त्वाचे आरोपी आहेत. त्यांच्याकडे सखोल विचारपूस करून गुन्ह्याचा तपास करणे  आवश्‍यक आहे. पोलिस कोठडीदरम्यान त्यांनी इतर आरोपींची नावे सांगण्यास टाळाटाळ केली आहे. वरील पाचजणांचा गुन्ह्यात महत्त्वाचा सहभाग आहे. त्यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन कायदेशीर रखवालीतून उत्तरपत्रिका काढून दिल्या. यात संस्थेतील इतर कोणाचा सहभाग आहे, काय याचा तपास करावयाचा आहे. आरोपींनी विद्यापीठातील कोणत्या अधिकाऱ्यांची मदत घेऊन सदरचा गुन्हा केला याबद्दल विचारपूस करावयाची आहे. आरोपींनी यापूर्वी असा गैरप्रकार किती वेळा व कुठे केला. आरोपी विद्यार्थ्यांशिवाय इतर कोणत्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे, याचा तपास करावयाचा आहे. त्यांच्याकडे महत्त्वाचा तपास करणे आवश्‍यक असल्यामुळे त्यांना पाच दिवस वाढीव पोलिस कोठडी मंजूर करावी, अशी विनंती केली; तर वरील पाच जणांतर्फे ॲड. जनार्दन मुरकुटे, ॲड. मच्छिंद्र दळवी आणि ॲड. शांताराम ढेपले यांनी युक्तिवाद केला. पोलिसांनी परीक्षेपूर्वी  घडलेल्या गुन्ह्यासाठीचे कलम लावले आहेत. घटना परीक्षेनंतरची असल्यामुळे ते लागू होत नाहीत. रिमांड यादीत पूर्वीचेच मुद्दे आहेत, असे मुद्दे मांडून पोलिस कोठडीची गरज नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Sitaram Sury and the students get bail on bail