नोटाबंदीच्या झळा अजूनही कायम 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

औरंगाबाद - पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर करून दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी परिस्थिती पूर्वपदावर आली नसल्याचे चित्र आहे. रविवारी (ता. 8) सुटीच्या दिवशी बहुतांश एटीएम बंद असल्याचे दिसून आले. 

औरंगाबाद - पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर करून दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी परिस्थिती पूर्वपदावर आली नसल्याचे चित्र आहे. रविवारी (ता. 8) सुटीच्या दिवशी बहुतांश एटीएम बंद असल्याचे दिसून आले. 

हजार, पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्याने औरंगाबादला मोठ्या प्रमाणात चलन तुटवड्याला सामोरे जावे लागले. बॅंका आणि एटीएममध्ये पैशांचा तब्बल महिनाभर ठणठणाट झाला होता. आपलेच पैसे आपल्याच खात्यातून घेण्यासाठी ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागले. साधारणत: पंधरा डिसेंबरनंतर रोख रकमेची स्थिती हळूहळू सुधारण्यास सुरवात झाली. मात्र, दोन हजार रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात बाजारात आल्या. त्यामुळे गृहिणींना दैनंदिन गरजेचे साहित्य (उदा. भाजीपाला, किराणा, दूध आदी) खरेदीसाठी सुट्यांची अडचण निर्माण झाली. रिझर्व्ह बॅंकेने अद्यापही पुरेशा प्रमाणात वीस, पन्नास, शंभर आणि पाचशे रुपयांच्या नोटा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. त्यामुळे सुटे पैसे मिळविण्यासाठी खातेधारकांची वणवण थांबलेली नाही. रविवारी सुटीच्या दिवशीदेखील शहरातील निम्म्याहून अधिक एटीएम बंद अवस्थेत होते. त्यामुळे काहींनी ओळखीच्या पेट्रोलपंप आणि व्यावसायिकांकडून दोन हजार रुपयांच्या नोटाचे सुटे पैसे घेऊन दिवस काढला. मात्र, नोटाबंदीनंतर अद्यापही इलेक्‍ट्रॉनिक, वाहन बाजारातील मंदी कायम आहे. 

स्वाईपचे व्यवहार वाढले 

नोटाबंदीनंतर शहरामध्ये युवकांचे ग्रुप व्यावसायिक आणि ग्रामीण भागात जाऊन कॅशलेस व्यवहारांबाबत जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. काहींकडे बॅंकेचे खाते, स्मार्टफोन आणि इंटरनेट नसल्याने कॅशलेस व्यवहार करण्यास अडसर येत आहे. तरीसुद्धा आपला व्यवसाय हातातून जाऊ नये, यासाठी सकारात्मक दृष्टीने व्यावसायिक स्वाईप मशीन, ई-गॅजेट आणि इंटरनेट बॅंकिंगच्या साहाय्याने व्यवहार पूर्ण करताहेत. गेल्या दोन महिन्यांत किरकोळ खरेदीसाठी डेबीट आणि क्रेडीट कार्डने व्यवहारांत वीस टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचा या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्‍त केला. 

Web Title: The situation has not been reinstated