बीडजवळ सहा दरोडेखोर पकडले, साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

बीड पोलिसांनी वाहनांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या सहा दरोडेखोरांना पकडले आहे. दरोडेखोरांकडून पाच लाख 56 हजार रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.

बीड - वाहने अडवून दरोडा घालण्याच्या तयारीतील सहा जणांच्या पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या आहेत. रविवारी (ता. सहा) रात्री उशिरा केलेल्या कारवाईत आरोपींकडून पाच लाख 56 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नाथा लाला गायकवाड (रा. शास्त्रीनगर, पेठबीड), दीपक मारोती जाधव (रा. गजानननगर पेठ, बीड), बप्पाराव त्रिंबक जाधव (रा. शास्त्रीनगर, पेठबीड), किरण अशोक नकवाल (रा. माऊलीनगर पेठ, बीड), शरद श्रीरंग जाधव (रा. वाघलखेडा, ता. अंबड, जि. जालना) व पठाण शाहरुख पठाण हमीद (रा. शहेनशाहनगर बीड) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. 

हेही वाचा - फटाका तोंडात फोडला...अन असे घडले...

दरोडा प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलिस निरिक्षक गजानन जाधव हे पथकासह रविवारी मध्यरात्री पेट्रोलिंग करीत असताना त्यांना नामलगाव फाट्याजवळील उड्डाणपुलाखाली काही व्यक्ती जीपमध्ये बसलेले असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार सदरील ठिकाणी छापा टाकून जीपमध्ये (एमएच- 04, डीवाय- 6793) सहाजण साहित्यासह दरोडा टाकण्याच्या तयारीत दिसून आले. 

हेही वाचा - ...आणि त्याच्या डोक्यावरून गेले जेसीबीचे चाक

पोलिस येताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिस कर्मचाऱ्यांनी शरद श्रीरंग जाधव, नाथा लाला गायकवाड, दीपक मारोती जाधव, बप्पाराव त्रिंबक जाधव, किरण अशोक नकवाल व पठाण शाहरुख पठाण हमीद या सहा जणांना पकडून त्यांच्याजवळील जीप, दरोडा टाकण्यासाठी एक लोखंडी छोटी कटाचणी, एक लोखंडी सळई असा एकूण पाच लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

हेही वाचा -   एसटी महामंडळाची हिटलरशाही

याप्रकरणी बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत श्री. आवारे, पोलिस हवालदार नागरगोजे, जयसिंग वाघ, श्री. शिंदे, श्री. जोगदंड यांनी सहभाग घेतला. गुन्ह्यातील आरोपींवर व चोरट्यांवर दरोडा प्रतिबंधक पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नजर राहणार असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six Robbers Caught Near Beed