पन्नास रुपये चोरल्याच्या आरोपातून  सहावीतील विद्यार्थ्याची आत्महत्या 

file photo
file photo

औरंगाबाद - बारा वर्षीय सहावीतील विद्यार्थ्याने दुकानातील गल्ल्यातून पन्नास रुपये घेतल्याचा आळ घेत दुकानदार महिलेने शाळा गाठली व तेथे विद्यार्थ्याला जाब विचारला. महिलेकडून अपमानित झाल्याने व मारहाणीच्या भीतीने तो लोहमार्गावर गेला आणि रेल्वेसमोर उडी घेऊन त्याने आत्महत्या केली. ही गंभीर घटना गुरुवारी (ता. 17) रात्री आठच्या सुमारास घडली. 

सुरज जनार्धन क्षिरसागर (वय 12) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो आनंदनगर, गारखेडा भागात राहत होता. त्याच्या वडीलाचे सलुन दुकान आहे. आनंदनगर येथे त्यांच्या घराशेजारी एका महिलेचे दुकान आहे. या दुकानात सुरज गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता गेला. तेथे थांबुन तो नंतर बहीण श्रद्धासोबत कलावती चव्हाण हायस्कुल या शाळेत गेला. ज्यावेळी सुरज दुकानात आला, तेव्हा त्याने पन्नास रुपये काढुन घेतले असा समज दुकानदार महिलेचा झाला. त्यामुळे त्या महिलेने सव्वा अकराच्या सुमारास शाळा गाठली.

तेथे सुरज व श्रद्धा होते. त्या महिलेने जोरात ओरडून ""सुरजला पकडला, त्याने दुकानातील गल्ल्यातून पन्नास रुपये घेतले.'' असे तिने उच्चारले. यामुळे सुरज भयभित झाला व तो तेथून पळुन गेला. सुरजच्या बहीणीने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु तो तेथून निघुन गेला. ही बाब दुकानदार महिलेने सुरजच्या कुटुंबियांना फोनवरुन सांगितली. त्यानंतर सुरजचे वडील जनार्धन क्षिरसागर दुकानात आले. त्यावेळी दुकानदार महिलेने त्यांना सुरजबद्दल सांगितले. यानंतर सुरजचा शोध सुरु झाला. 
 

रेल्वेसमोर घेतली उडी 
अपमान व भयभित झाल्याने सुरज शाळेतुन गेला खरा परंतु त्याने थेट रेल्वेमार्ग गाठला. तेथे रेल्वे येण्याची त्याने वाट पाहीली. रेल्वे धाडधाड येताच त्याने रेल्वेसमोर उडी मारुन आपले जीवन संपविले. ही बाब पुंडलिकनगर पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी धाव घेत सुरजला त्याच अवस्थेत घाटी रुग्णालयात नेले. दरम्यान त्याच्या नातेवाईकांना हा प्रकार सांगितला. 

पेपर बुडाल्यामुळे मनस्ताप 
चोरीचा आरोप झाल्याने सुरजला मनस्ताप झाला. शाळेतुन तो निघुन गेल्यामुळे त्या दिवशीची परिक्षाही त्याला देता आली नाही. एकीकडे पेपर बुडाला तर दुसरीकडे भिती यामुळे सुरजने हे पाऊल उचलल्याचे त्याचे वडील जनार्धन क्षिरसागर यांनी तक्रारीत नमुद केले त्यानुसार या प्रकरणी दुकानदार महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com