साठ हजार क्विंटल तूर पडून 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

लातूर -  येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात हमी भावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी सुरू होती. बाजार समितीच्या कारवाईनंतर तुरीचा सौदाच बंद झाला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून बाजारात साठ हजार क्विंटल तूर तशीच पडून आहे. दरम्यान जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सोमवारी (ता. 6) एक बैठक बोलावली आहे. यात काय निर्णय होतो याकडे आता लक्ष लागले आहे. दरम्यान नाफेडच्या खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात तूर खरेदीची यंत्रणाच नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. 

मराठवाड्यात लातूर ही मोठी बाजारपेठ आहे. परिसरासोबतच कर्नाटकातील तूरही मोठ्या प्रमाणात येथे येते. या हंगामात गेल्या काही महिन्यांपासून चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपये दराने तुरीची खरेदी सुरू होती; पण हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी केली तर बाजार समितीवरच कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे. बाजार समितीच्या सचिवांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत. 

त्यामुळे बाजार समितीने तातडीने आदेशाची अंमलबजावणी करीत गुरुवारी सौदाच बंद केला. गेल्या तीन-चार दिवसांपासून बाजार बंदच राहिला आहे. तुरीचा सौदाच निघू शकला नाही. त्यामुळे साठ हजार क्विंटल तूर बाजारात पडून आहे. नाफेडच्या वतीने तुरीचे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर आतापर्यंत तीस हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. पण या केंद्रावर मिक्‍स तूर, काळी तूर खरेदी केली जात नाही. केवळ चांगलाच माल खरेदी केला जातो. त्यांच्याकडे यंत्रणाही तोकडी आहे. बाजारात मात्र सर्वच तूर खरेदी केली जाते; पण सौदाच निघत नसल्याने ही तूर तशीच पडून आहे. यातून आडते, व्यापाऱ्यांपेक्षा शेतकरीच अधिक अडचणीत येत आहेत. 
दरम्यान जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सोमवारी (ता. 6) बैठक बोलावली आहे. यात जिल्ह्यातील सर्व अकरा बाजार समित्यांच्या सचिवांना बोलावण्यात आले आहे. तसेच नाफेडचे अधिकारी, खरेदीदार कंपन्यांनाही बोलाविण्यात आले आहे. त्यामुळे या बैठकीकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: Sixty thousand quintals of tur fall