एसटीच्या चालकांची अंतर कापताना दमछाक

अनिल जमधडे
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

औरंगाबाद-जळगाव रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे आणि रस्ता खोदून ठेवलेला असल्यामुळे एसटी महामंडळाने चालकांना ठरवून दिलेला वेळ (धाववेळ) कमी पडत आहे. वर्षभरापासून धाववेळ गाठताना चालकांची अक्षरश: दमछाक होत आहे. त्यामुळे याविरोधात औरंगाबाद विभाग एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने या मार्गावर बस न चालविण्याचा इशारा दिला आहे. 
 

औरंगाबाद-जळगाव रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे आणि रस्ता खोदून ठेवलेला असल्यामुळे एसटी महामंडळाने चालकांना ठरवून दिलेला वेळ (धाववेळ) कमी पडत आहे. वर्षभरापासून धाववेळ गाठताना चालकांची अक्षरश: दमछाक होत आहे. त्यामुळे याविरोधात औरंगाबाद विभाग एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने या मार्गावर बस न चालविण्याचा इशारा दिला आहे. 

एसटी महामंडळातर्फे प्रत्येक मार्गावर बसला लागणारा वेळ ठरवून देण्यात येतो. त्यानुसार निर्धारित वेळेत बसचालकाने वाहन चालविणे अपेक्षित असते. प्रत्येक फेरीनंतर किती वेळेत अंतर कापले, याची नोंद घेतल्यानंतर वाढलेल्या वेळेनुसार चालकाला अतिरिक्त भत्ता दिला जातो. हे ठरविलेल्या धाववेळेनुसार ठरविण्यात येत असते. एसटी महामंडळाने औरंगाबाद-जळगावसाठी 3.30 तास हा धाववेळ ठरवून दिलेला आहे; मात्र वर्षभरापासून जळगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. ठिकठिकाणी खोदकाम केलेले आहे. रस्ता प्रचंड धोकादायक झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये चालकाला औरंगाबाद ते जळगाव रस्त्यावर पाच ते साडेपाच तास वेळ लागतो. त्यामुळे चालकांना अतिरिक्त वेळ देऊनही कामाप्रमाणे भत्ता मिळत नाही.

अगोदरच वेतन कमी असलेल्या चालकांना कामाचा योग्य मोबदला मिळत नाही. त्यातच रस्त्याच्या कामामुळे वाहनांच्या होणाऱ्या तुटफुटीचा जाब विचारून कारवाई करण्यात येत आहे. चालकांना धाववेळ गाठण्याच्या प्रयत्नात अपघाताची शक्‍यता वाढते. त्यामुळेच रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत साडेपाच तासांची धाववेळ करण्यात यावी, अशी मागणी कृती समितीने केली. यासंदर्भात विभाग नियंत्रकांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव बाबासाहेब साळुंके, कामगार सेनेचे विभागीय सचिव शिवाजी बोर्डे, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनचे मकरंद कुलकर्णी, "इंटक'चे के. टी. पटवर्धन, विभागीय अध्यक्ष सतीश जाधव, राज्य उपाध्यक्ष राजेंद्र मोटे यांची उपस्थिती होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Slamming the ST's driver's distance

फोटो गॅलरी