लातूर येथे पशूसंवर्धन विभागाकडून झाडांची कत्तल

हरी तुगावकर
बुधवार, 4 जुलै 2018

महापालिकेच्या उपायुक्तांनी पशूसंवर्धन विभागाच्या उपसंचालकांना नोटीस देवून झाडांची कत्तल केल्याप्रकरणी तातडीने खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

लातूर - राज्यभर १३ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम सुरु असतानाच येथील पशूसंवर्धन विभागाने कोणतीही परवानगी न घेता झाडांची कत्तल केली आहे. या प्रकरणाची दखल घेत महापालिकेच्या उपायुक्तांनी पशूसंवर्धन
विभागाच्या उपसंचालकांना नोटीस देवून झाडांची कत्तल केल्याप्रकरणी
तातडीने खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

सध्या राज्यभर १३ कोटी वृक्षलागवडीचा उपक्रम राबविला जात आहे.
मुख्यमंत्र्यापासून ते शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण या उपक्रमात सहभागी होत आहेत. प्रत्येक जिल्ह्याला वृक्षलागवडीचे उद्दीष्ट दिले आहे. ते
पूर्ण करण्याची सक्त ताकीदही शासनाच्या वतीने सर्व विभागाना देण्यात आली आहे. ठिकठिकाणी कार्यक्रम घेवून ता. एक जुलैपासून या वृक्षलागवडीच्या मोहिमेला सुरवात झाली आहे. लातूर जिल्ह्यात देखील पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरवात झाली. एकीकडे जोमाने वृक्ष लागवड सुरु असताना येथील पशूसंवर्धन विभागाच्या परिसरात असलेल्या मोठ मोठ्या झा़डांची कत्तल करण्यात आली आहे. या करीता कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याची बाबही समोर येत आहे.

trees

महापालिकेच्या हद्दीत एखादे झा़ड तोडायचे असेल तर आयुक्तांची परवानगी
घेणे आवश्यक आहे. पण पशूसंवर्धन विभागाने आयुक्तांची परवानगीच घेतली नसल्याचे समोर आले आहे. यातून महापालिकेच्या उपायुक्तांनी पशूसंवर्धन विभागाच्या उपसंचालाकांना मंगळवारी (ता. ३) एक नोटीस दिली आहे. आपल्या कार्यालयाच्या जागेवरील नऊ झाडे ता. ३० जून रोजी अनाधिकृत पणे तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. ही झाडे तोडताना महाराष्ट्र शासन झाडांचे जतन व  संरक्षण अधिनियम १९७५ चे कलम आठ पोटकलम तीन अन्वये मान्यता घेतलेली नाही. या कलमाचे उल्लंघन करण्यात आले आहे. तीन दिवसात अनाधिकृतपण नऊ झाडे तोडल्याबाबत खुलासा सादर करावा अन्यथा वरील नियमाप्रमाणे आपल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा महापालिकेच्या उपायुक्तांनी पशूसंवर्धन विभागाच्या उपसंचालकांना नोटीसीद्वारे दिला आहे. ही नोटीस मंगळवारी (ता.३) देण्यात आली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Slaughter of trees from Latur Department of Animal Husbandry