गुळगुळीत रस्त्यावरच ३७ कोटींचा ‘स्मार्ट लेप’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद - केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन हा ‘स्मार्ट’ रस्ता म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाच-सहा वर्षांपूर्वी तब्बल ३४ कोटी रुपये खर्च करून सिमेंट क्राँक्रिटीकरण करण्यात आलेल्या याच रस्त्यावर आता ३७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ही निविदा काढण्याचा निर्णय गुरुवारी (ता. २९) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन, रेल्वेस्टेशन ते महावीर चौक व महावीर चौक ते क्रांती चौक असा रस्ता ‘स्मार्ट रोड’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. यासंदर्भात महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी आढावा घेतला. 

त्यानंतर माहिती देताना ते म्हणाले, की स्मार्ट रोडसाठी दोन टप्पे करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात रेल्वेस्टेशनपर्यंतचा रस्ता सुशोभित करण्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे. त्यावर ३७ कोटी रुपये खर्च करण्यात येतील. रस्त्याच्या दुतर्फा सुशोभीकरण, रंगरंगोटी, पार्किंग विकसित करणे, पथदिवे बसविणे अशा कामांचा यात समावेश असेल. 

स्मार्ट रस्त्याचा संपूर्ण खर्च तब्बल शंभर कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असे महापौरांनी नमूद केले. उर्वरित काम दुसऱ्या टप्प्यात करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

सुशोभीकरणावर कामापेक्षा जास्त खर्च 
पाच-सहा वर्षांपूर्वीच हा रस्ता महापालिकेने गुळगुळीत केला आहे. त्यावर तब्बल ३४ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. अद्याप हे काम शंभर टक्के पूर्ण झालेले नाही. असे असतानाच आता केवळ सुशोभीकरणावर मूळ कामापेक्षा तीन कोटी रुपये जास्तीचे खर्च केले जाणार आहेत. या निधीतून शहरातील अत्यंत खराब झालेले तीन ते चार मोठे रस्ते होऊ शकतात. 

सायकल ट्रॅकसाठी पाच कोटी 
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सायकल ट्रॅक विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे. या ट्रॅकसाठी लवकरच रस्त्यांची निवड करण्यात येणार आहे. 

Web Title: Smart City Road Smart Lape Cycle Parking