स्मार्ट सिटीच्या पहिल्याच कामाला नाट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

औरंगाबाद - मोठा गाजावाजा करून स्मार्ट सिटीच्या कामाचा नारळ महापालिकेने फोडला होता; मात्र पहिल्याच सौरऊर्जा प्रकल्पाला नाट लागला असून, ॲडव्हान्स बिलाची मागणी करीत कंत्राटदाराने महापालिकेला बेजार केले आहे. काम संपविण्याची मुदत संपली असली तरी अद्याप महापालिकेच्या छतावर एक पॅनेलसुद्धा लागलेले नाही. 

औरंगाबाद - मोठा गाजावाजा करून स्मार्ट सिटीच्या कामाचा नारळ महापालिकेने फोडला होता; मात्र पहिल्याच सौरऊर्जा प्रकल्पाला नाट लागला असून, ॲडव्हान्स बिलाची मागणी करीत कंत्राटदाराने महापालिकेला बेजार केले आहे. काम संपविण्याची मुदत संपली असली तरी अद्याप महापालिकेच्या छतावर एक पॅनेलसुद्धा लागलेले नाही. 

औरंगाबाद शहराची केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत निवड झाल्यानंतर कोट्यवधी रुपयांचा निधी महापालिकेला प्राप्त झाला आहे; परंतु गेल्या वर्षभरात एकही काम महापालिका सुरू करू शकलेली नाही. शहर बस, घनकचरा व्यवस्थापनासाठी रिक्षा खरेदी करण्याबाबत गेल्या सहा महिन्यांपासून केवळ बैठकांवर बैठका सुरू आहेत. मोठा गाजावाजा करून स्मार्ट सिटीतील पहिल्या कामाचे सौरऊर्जा प्रकल्पाचे नारळ पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते २६ जानेवारीला फोडण्यात आले होते. मार्च महिन्यात काम पूर्ण करण्याची मुदत कंत्राटदाराला देण्यात आली होती. महापालिका कार्यालयाला लागणारी वीज या प्रकल्पातून मिळाल्यास मोठी बचत होईल, असा दावा तत्कालीन आयुक्तांनी केला होता; तर मुदतीच्या आधी केवळ दोन आठवड्यांत काम पूर्ण होईल, असे कार्यकारी अभियंता सिकंदर अली छातीठोकपणे सांगत होते. कामाची मुदत संपून एक महिना उलटला असला तरी अद्याप महापालिकेच्या छतावर एक पॅनेलसुद्धा लागलेले नाही. प्राप्त माहितीनुसार संबंधित कंत्राटदाराने ॲडव्हान्स पैशासाठी महापालिकेकडे तगादा लावला असून, यापूर्वीदेखील महापालिकेने कंत्राटदाराला बिलाबाबत लेखी दिले होते; मात्र त्यानंतरही काम सुरू करण्यात आलेले नाही.

विषय ठरले, लवकरच बैठक 
स्मार्ट सिटीची बैठक दर तीन महिन्यांनी घेणे आवश्‍यक आहे. त्यानुसार पुढील बैठकीसाठी स्मार्ट सिटी एसपीव्हीचे संचालक सुनील पोरवाल यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक होणार आहे. स्मार्ट उद्यान, स्मार्ट रस्ता, स्मार्ट हॉस्पिटल, सोलार सिटी आणि शहर बस अशा विषयांची विषयपत्रिका तयार करून ती श्री. पोरवाल यांना पाठवण्यात आली आहे.

Web Title: smart city work issue