न्यायालयात घुसला साप, सगळेच बेजार, अखेर वृद्ध सर्पमित्र मदतीला

यादव शिंदे
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

सोयगावच्या दिवाणी व फौजदारी कनिष्ठ न्यायालयात गुरुवारी दुपारी चक्क आठ फुट लांबीच्या सापाने प्रवेश करून खळबळ उडवून दिली. न्यायालयाच्या आत प्रवेश केलेला साप दिसला अनेकांना, पण तो गेला कुठे ते कळेचना.

सोयगाव (जि. औरंगाबाद) : जंगलात साप दिसणे हे स्वाभाविक आहे.परंतु गुरुवारी (ता. २१) चक्क न्यायालयातच साप घुसला. पण तो गेला कुठे हे कळालेच नाही, त्यामुळे घटनास्थळी आलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचीही चांगलीच धावपळ सुरू झाली. अखेर एका वृद्ध सर्पमित्राने रात्री उशिरा हा साप शोधून काढला आणि जंगलात नेऊन सोडला.  

सोयगावच्या दिवाणी व फौजदारी कनिष्ठ न्यायालयात गुरुवारी दुपारी चक्क आठ फुट लांबीच्या सापाने प्रवेश करून खळबळ उडवून दिली. न्यायालयाच्या आत प्रवेश केलेला साप दिसला अनेकांना, पण तो गेला कुठे ते कळेचना. सापाचा मार्ग कळू न शकल्याने वनविभागाच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले, परंतु वनविभागाच्या पथकालाही या सापाने गुंगारा दिला. 

शिवसेनेविरुद्ध तक्रार म्हणजे मूर्खपणाचा कळस - कोण कोणास म्हणाले?

आता न्यायालयातच साप आहे म्हटल्यावर, तो शोधणे तर फार आवश्यक होते. संध्याकाळ झाली, अंधार पडला. कुणीतरी काळदरी (ता.सोयगाव) येथील 
ज्येष्ठ सर्पमित्र सुभाष त्र्यंबक जोशी यांना घटनास्थळी बोलावले. सायंकाळी उशिरा आल्यावर सुभाष जोशी यांनी अथक परिश्रमानंतर साप शोधला. ती आठ फूट लांबीची धामण होती. तिला जोशी यांनी रात्री सुरक्षितरित्या बाहेर काढले. साप बाहेर काढला जाताच न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी मात्र सुटकेचा नि:श्वास सोडला.

Soygaon News

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार... 

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार सोयगावच्या दिवाणी न्यायालयात दुपारी तीन वाजेनंतर अचानक रेकॉर्ड रूममध्ये साप आढळल्याचा दूरध्वनीवरून माहिती मिळाल्यावरून वनक्षेत्रपाल राहुल सपकाळ यांच्या सूचनेवरून वनरक्षक भिका पाटील, सुनील चंदवडे, गणेश परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु रेकॉर्डरूममध्ये लपलेला साप चकवा देत असल्याने अखेरीस वनविभागाने तातडीने काळदरी ता.सोयगाव येथील सर्पमित्र सुभाष यांना घटनास्थळी पाचारण केले. 

सर्पमित्र घटनास्थळावर येईपर्यंत वनविभागाच्या पथकाने सापाच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवत पाळत ठेवली होती. दरम्यान सर्पमित्र सुभाष जोशी घटनास्थळावर आल्यावर त्यांनी काही मिनिटात आठ फुटाच्या धामण प्रजातीच्या सापाला बाहेर काढले व वनविभागाच्या पथकाने बाहेर काढलेल्या सापाला सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Snake in Soygaon Court Aurangabad