.. तर सर्वच निवडणुकांवर बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

भुकंपग्रस्त गाव सव्वीस वर्षांपासून पक्‍क्‍या रस्त्याच्या प्रतिक्षेत 

किल्लारी(ता. औसा, जि. लातूर) ः वर्ष 1993 च्या भूकंपानंतर भूकंपग्रस्त भागातील गोटेवाडी (ता. औसा) गावचे पुनर्वसन झाले. नवीन घरे बांधून देण्यात आले; मात्र गावाला जाण्यासाठी रस्त्याचे पक्के काम झाले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन विनंती केली; पण तरीही पक्का रस्ता झाला नाही.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदानावर बहिष्कार टाकल्यानंतर प्रशासनाने गावात येऊन केवळ आश्वासन दिले. मात्र, रस्ता अद्याप झाला नसल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी शुक्रवारी (ता.13) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा दिला आहे. 

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गोटेवाडी ग्रामस्थांनी आपल्या रस्त्याबाबतच्या समस्या तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडल्या होत्या. तेव्हाही ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. गावाकडे जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. त्यामुळे यावरून वाहन नेणे अवघड आहे. पावसाळ्यात तर या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटतो. गर्भवती महिला किंवा रुग्णांना दवाखान्यात नेताना मोठ्या अडचणी येतात. अनेक रुग्ण दवाखान्यात नेण्यापूर्वी दगावले आहेत.

यामुळे गावाची मोठी हानी झालेली असून, गेल्या सव्वीस वर्षांपासून हे गाव कच्च्या मातीच्या रस्त्यावरून ये-जा करीत आहे. प्रशासनाला यापूर्वी दिलेल्या निवेदनाचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याने वर्ष 2019 मध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्काराचे हत्यार उपसले आहे. यानंतर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही ग्रामस्थांनी घेतला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: .. so boycott all elections