औरंगाबादेतील घटनेत सांप्रदायिकता नव्हे, सहिष्णुता

मनोज साखरे
रविवार, 21 जुलै 2019

त्याला मारहाण झाली हे नक्की; परंतु 'जय श्रीराम' म्हणण्याचा व घटनेचा काही संबंध आहे का, याची आम्ही पडताळणी सुरू केली. पोलिस अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. त्यावेळी अनेक बाबी समोर आल्या. घडलेल्या घटनेत मारहाण झालेल्या तरुणाला 'जय श्रीराम'चा नारा देण्यास सक्ती केल्याचा संबंध नव्हता.

औरंगाबाद - 'ते' त्याला मारत होते, "तो' मदतीसाठी धावा करीत होता. कानी आवाज पडताच जात, धर्म, पंथ न पाहता मदतीच्या भावनेने काळे कुटुंबीयांनी त्या तरुणाची सुटका करून त्याला सुखरूप घरी पाठविले. धार्मिक तेढ वाढविणाऱ्यांना ही चपराकच होती. या घटनेला 'जय श्रीराम'चा रंग देण्यात येऊ लागला, हे आतापर्यंतच्या पडताळणीतून समोर येत आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय, धार्मिक तेढ वाढविण्याचाच हा प्रकार दिसतो. 

हॉटेलात काम करणारा इम्रान पटेल (वय 28) याला हडको, एन-11, मुझफ्फरनगर येथे मारहाणीचा प्रकार गुरुवारी (ता.18) मध्यरात्री घडला. यात बेगमपुरा पोलिस ठाण्यात
टोळक्‍याविरुद्ध गुन्ह्याची नोंदही झाली. त्याने दावा केला, की मला मारहाण करताना 'जय श्रीराम' म्हणायला भाग पाडण्यात आले. त्याला मारहाण झाली हे नक्की; परंतु 'जय श्रीराम' म्हणण्याचा व घटनेचा काही संबंध आहे का, याची आम्ही पडताळणी सुरू केली. पोलिस अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. त्यावेळी अनेक बाबी समोर आल्या. घडलेल्या घटनेत मारहाण झालेल्या तरुणाला 'जय श्रीराम'चा नारा देण्यास सक्ती केल्याचा संबंध नव्हता; परंतु नंतर सोयिस्करपणे तो संबंध आणला गेला, अशीच बाब पडताळलेल्या सूत्रांकडून सांगण्यात आली. 
 
सूत्र सांगतात ही फॅक्‍ट 
पोलिस दलातील सूत्रांनी सांगितले, की मारहाण झालेला इम्रान तक्रार देण्यासाठी आला. त्यावेळी त्याने "काही जणांनी मला थांबविले. ते 'जय श्रीराम'ची घोषणा देत होते. त्यांनी मला मारहाण केली.'' असे पोलिसांना सांगितले. नंतर मात्र त्याच्या मदतीसाठी काही संघटनांचे लोक आले व त्यांनी धार्मिक व राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करीत 'जय श्रीराम'म्हणण्यासही भाग पाडण्यात आल्याचा सूर पुढे नेला. आम्ही साक्षीदार तपासल्यानंतर भांडण वैयक्तिक स्वरूपाचे असल्याचे समोर येत आहे. टोळक्‍यातील काहीजण मद्यसेवन केलेले होते असेही पुढे आले. 
 

पोलिस आयुक्तांशी बोलल्यानंतर... 

  1. काय फॅक्‍ट आहे ? : आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले की, तरुणाला मारहाण झाली. 
  2. साक्षीदार काय म्हणतात ? : एक-दोन साक्षीदार आम्हाला भेटले. ते म्हणतात की, सर "जय श्रीराम' म्हणण्याबाबतचा असा काही प्रकार झाला नाही. सत्यता काय, याची पडताळणी करावी लागेल. 
  3. संशयित निष्पन्न झाले का? : होय, फॅक्‍ट शोधण्याचा प्रयत्न करतो आहोत. दोन संशयित निष्पन्न झाले. यातील एका साक्षीदारानेही मारहाणीशिवाय असा काहीच प्रकार झालाच नाही, असे सांगण्यात आले आहे. 

(मारहाणीतील तरुणाला वाचविणाऱ्या काळे कुटुंबाशी आम्ही चर्चा केली. त्यावेळी त्यांनी दिलेली माहिती) 
"आम्हाला आवाज येत होता. वाचवा..वाचवा...असे शब्द कानावर पडत होते. आम्ही झोपेतून जागे झालो. आम्ही बाहेर गेलो, बघितलं तर सहा ते सात मुलं जमा झाली होती. मारहाण झालेला मुलगा म्हणत होता की, ताई मी कामाहून आलो. मी जाताना हे मला मारताहेत. मग माझ्या पतीनं मारहाण करणाऱ्या मुलांना चावी मागितली. ती घेऊन मारहाण झालेल्या मुलाला दिली, मग त्याला सुखरूप पाठवून दिलं. आम्ही येण्याआधी त्यांचे काही झाले असेल माहीत नाही; परंतु आम्ही गेलो तेव्हा ती मुलं "जय श्रीराम' म्हणायची सक्ती करीत नव्हती किंवा मारहाण झालेला तरुणही म्हणत नव्हता, की मला 'जय श्रीराम' म्हणायला लावले.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: so called Hitting case