सोशल मीडियावर पालिका निवडणुकीची रणधुमाळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

उस्मानाबाद - सोशल मीडियावर पालिका निवडणुकीचा बोलबाला सुरू झाला आहे. ‘नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण’ यावरच चर्चा रंगल्याने सोशल मीडियावर पालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे.

उस्मानाबाद - सोशल मीडियावर पालिका निवडणुकीचा बोलबाला सुरू झाला आहे. ‘नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण’ यावरच चर्चा रंगल्याने सोशल मीडियावर पालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे.

नगरपालिकेची निवडणूक येत्या डिसेंबर महिन्यात होत आहे. त्यासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. गेल्या बुधवारी (ता. पाच) नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले. उस्मानाबाद पालिकेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होताच सोशल मीडियावर राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. सांगा कोण असेल नगराध्यक्षपदाचा उमेदवार?, यावर प्रतिक्रिया मागविल्या जात आहेत. त्यावर आपला पठ्याच नगराध्यक्ष, यंदा फक्त भैय्याच, नगराध्यक्ष केवळ आमचाच, आमचा नाद करायचा नाही, दादाचा नाद खुळा अशा प्रतिक्रिया आल्याने नगराध्यक्षपदासाठी मोठी चुरस राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आता ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर फटाके फोडण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक इच्छुक उमेदवाराचे कार्यकर्ते सध्या सोशल मीडियावर चांगलेच ॲक्‍टिव्ह झाले आहेत. दररोज नवीन पोस्ट टाकल्या जात आहेत. संपूर्ण वर्षात केलेल्या कामाची माहिती देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासोबतच आश्‍वासनांची खैरातही होत आहे. वेगळ्या पक्षातून आयात केलेल्या उमेदवारांचा फोटो पेस्ट करून आता आमचेच पारडे जड आहे, अशा पोस्टही काहींनी टाकल्या आहेत. आरक्षणातून जातीची गणिते मांडली जात आहेत. विकासाचा मुद्दाही महत्त्वाचा असल्याचे काही जाणकार सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. व्हॉट्‌सअप, फेसबुकवर दररोज पालिका निवडणुकीच्या नवनवीन पोस्ट पडत असल्याने सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध चांगलेच रंगात आल्याचे दिसून येत आहे. उमेदवार निश्‍चित होण्यापूर्वीच सोशल मीडियावर पालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. एकदा उमेदवार निश्‍चित झाल्यानंतर मात्र यामध्ये चांगलीच रंगत येणार असल्याचे संकेत यातून मिळू लागले आहेत.

Web Title: Social media on municipal elections publicity