सोशल मीडियामुळे जगण्याला मिळतोय "सोशल टच'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

व्हॉट्‌सऍप आणि फेसबुक 
सोशल मीडिया म्हटले तर आपल्या डोळ्यांसमोर प्रामुख्याने व्हॉट्‌सऍप किंवा फेसबुक ही दोन माध्यमे येतात. या माध्यमातून संदेश, फोटो पाठवणे, एकमेकांना चॅटिंग करणे हे पर्याय आहेत. वास्तविक सोशल मीडियामध्ये फेसबुक, व्हॉट्‌सऍपसह लिंक्‍ड्‌ इन, ट्विटर, ब्लॉग, हाईक यांसारख्या माध्यमांचा उपयोग होतो. पूर्वीच्या काळातील सर्व मर्यादा सोशल मीडियाने मोडीत काढल्या आहेत. 

औरंगाबाद - सोशल मीडियाच्या माध्यमातून जगणे सुसह्य झाले आहे. जगभरातील नेटवर्क आणि अमर्याद फायदे घेता येतात. क्षणार्धात माहितीचे शेअरिंग करता येते. एवढेच काय, तर आता संपूर्ण आर्थिक व्यवहारही या माध्यमातून करता येणार आहेत. 

झपाट्याने झाली क्रांती 
ग्रॅहम बेलच्या टेलिफोनच्या शोधानंतर संपर्क क्षेत्रात झपाट्याने प्रगती झाली. धावपळीच्या जगात शर्यतीप्रमाणे धावताना माणसाला मित्र, स्नेही, नातेवाईक यासाठी वेळच उरला नाही. असे असले तरीही सोशल नेटवर्किंगच्या शोधानंतर आपल्या मित्रत्वाचे नाते जगभर निर्माण झाले, ही वस्तुस्थिती आहे. या जगभरातील मित्रांना दररोज भेटण्याची, त्यांच्या बऱ्यावाईट प्रसंगांना अप्रत्यक्ष का होईना पण उपस्थित राहण्याची संधी या सोशल नेटवर्किंगने उपलब्ध करून दिली आहे. महत्वाचे म्हणजे सोशल नेटवर्किंग साईट्‌सवरील मैत्रीला वय नसतं. त्यामुळे साठ वर्षांचे आजोबा सोळा वर्षांच्या विद्यार्थ्याचे मित्र अगदी आरामात होऊ शकतात. कॉलेज गोइंग मुलांचे पालकही या सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून आपल्या मुलांच्या आवडीनिवडी काय आहेत, यावर कटाक्ष ठेवू लागले आहेत. 
 

तरुणाईला पडलीय भुरळ 
सोशल मीडियातील व्हॉट्‌सऍप, फेसबुक आणि ट्‌विटर या तीन माध्यमांचा सर्वाधिक मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. साधारणपणे 18 ते 35 वयोगटातील जवळपास 65 टक्के तरुणाई फेसबुकचा वापर करते. तर जवळपास 82 टक्के लोक व्हॉट्‌सऍपचा वापर करतात. व्हॉट्‌सऍपच्या माध्यमाने कुटुंबातील सदस्यांचा ग्रुप, महाविद्यालयीन मित्र-मैत्रिणींचा ग्रुप, शिक्षकांचा ग्रुप, विद्यार्थ्यांचा ग्रुप, कोचिंग क्‍लासेसचा ग्रुप, खेळाडूंचा ग्रुप, धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने तयार झालेले ग्रुप, चित्रपटविषयक ग्रुप, राजकीय पक्ष-संघटनांचे ग्रुप, विविध आस्थापनेतील कर्मचाऱ्यांचे ग्रुप अशा एक ना अनेक प्रकारच्या ग्रुपचा समावेश असतो. व्हॉट्‌सऍपच्या "न्यू ब्रॉडकास्ट‘ या ऑप्शनच्या मदतीने एकाच वेळी शंभरपेक्षा अधिक लोकांना वैयक्तिक स्वरूपात मेसेज पाठविण्याची व्यवस्था आता सुरू झाली आहे. दुसरीकडे सोशल मीडियाशी संबंधित "फेसबुक‘ हे एक प्रभावी माध्यम आहे. यामध्ये जास्तीत जास्त शेअरिंग हे कौटुंबिक समारंभाचे असते. दुसरे शेअरिंग हे मित्र-मैत्रिणींचे असते, तर तिसरे शेअरिंग हे जाती-धर्माच्या संबंधातीलही असते. याशिवाय राजकीय, धार्मिक व सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संघटना संस्था यांच्या पेजेसचा फेसबुकमध्ये समावेश असतो. या सर्वांचा उद्देश आपापल्या कार्याची माहिती शेअर करणे आणि विचारांची देवाणघेवाण करणे हा असतो. फेसबुकवर लाईक करून, कमेंट करून किंवा ती पोस्ट शेअर करून मते व्यक्त करता येतात. या तीनही शेअरिंग प्रकारात सर्वाधिक प्रमाण हे लाईक करण्याच्या पर्यायाचे आहे. 
 

गांभीर्यही आवश्‍यक 
फेसबुक किंवा व्हॉट्‌सऍपवरील पोस्टला लाईक, शेअरिंग करताना अथवा त्यावर कमेंट करताना घटनेचे गांभीर्य बाळगणे आवश्‍यक असते. त्यावर विचारपूर्वक प्रतिक्रिया देणे अपेक्षित असते. मात्र, अलीकडच्या काळात नेमके याच बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या माध्यमांचे चांगले-वाईट असे दोन्ही परिणाम दिसत असले तरीही सकारात्मक उपयोग अधिक होत आहे. 
 

फेसबुकमुळे जुळतो मैत्रीचा धागा 
फेसबुक मेसेंजरवर अगदी अलीकडे दररोजच्या जीवनात उपयोगी ठरू शकतील, अशा बाबींचा समावेश करण्यात आला आहे. त्यात पैशांची देवाणघेवाण, प्रवासाच्या तिकिटांचे आरक्षण, हव्या त्या मनपसंत वस्तूंची ई-कॉमर्सच्या माध्यमातून खरेदी ही वैशिष्ट्ये मेसेंजरने स्वीकारली आहेत. फेसबुक पेजवर ज्या पद्धतीने आपण मित्रांशी चॅट करू शकतो, त्याचप्रमाणे फेसबुक बॉटसच्या माध्यमातूनही चॅट करण्याबरोबरच खरेदी करता येऊ शकेल. विमानाचे तिकीट किंवा हॉटेलमध्ये सूट बुक, पैशांची देवाणघेवाण किंवा मेसेंजरचा वापर करून डेबिट कार्डच्या साहाय्याने फेसबुकवरील मित्रांना तत्काळ पैसे पाठवणेही लवकरच शक्‍य होईल. हा नवीन प्रकार असून, तो युजरला नक्की फायदेशीर ठरणारा आहे. याशिवाय फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून व्हीडीओ कॉल करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे गेम्स खेळण्याचीही सुविधा फेसबुकने उपलब्ध करून दिली आहे. फेसबुकने आता तर नव्याने लाईव्ह ऑप्शन उपलब्ध करून दिले. यामुळे तुमच्या समारंभाचे किंवा तुम्ही असलेल्या ठिकाणचे व्हीडीओ चित्रीकरण करून ते थेट तुमच्या "फ्रेन्ड लिस्ट‘मधील मित्रांसोबत लाईव्ह पद्धतीने शेअर करण्याची व्यवस्थाही नुकतीच सुरू झाली आहे. 
 

ट्‌विटरने मिळते भावनांना वाट 
ट्‌विटरच्या माध्यमातूनही आपल्या भावनांना वाट करून देण्याचा मार्ग सोशल मीडियात उपलब्ध झालेला आहे. देश-विदेशातील सेलिब्रिटी, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि विविध खात्यांचे मंत्री िंकवा उच्चपदस्थ व्यक्ती ट्‌विट करून आपल्या भूमिका स्पष्ट करतात. ट्‌विटरवर आलेल्या ट्टिटला रिट्विट करून त्याचे उत्तर अथवा प्रतिक्रियाही देण्याची व्यवस्था यात आहे. ट्‌विटरच्या माध्यमाने आलेल्या प्रतिक्रियेला अलीकडच्या काळात अधिक महत्व निर्माण झालेले आहे. एखाद्या व्यक्तीच्या भाषणाने वाद निर्माण होतो, त्यावेळी राजीनामा द्या किंवा माफी मागा असा सूर उमटल्यानंतर संबंधित मंत्री अथवा व्यक्ती ट्‌विटरवरून माफीनामा सादर करून मोकळा होतो. हे अलीकडच्या काळात दिसून येत आहे. ट्‌विटरवर फोटो, व्हीडीओ क्‍लिप टाकण्याचीही व्यवस्था असल्याने फेसबुक, व्हॉट्‌सऍपप्रमाणे हेही अत्यंत लोकप्रिय माध्यम झालेले आहे. 
 

रेल्वेचा महत्त्वपूर्ण प्रयोग 
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचा तक्रारींचे निवारण करण्यासाठी केलेला "ट्विटर‘चा प्रभावी प्रयोग केंद्रीय मंत्रिमंडळात चांगलाच लोकप्रिय झाला. त्यामुळे रेल्वेपाठोपाठ दूरसंचार मंत्रालयानेही "ट्विटर‘चा अवलंब करण्याचे धोरण स्वीकारले आहे. बीएसएनएल, मुंबईत एमटीएनएल आणि टपाल खात्याच्या संदर्भात असणाऱ्या तक्रारी आता "ट्विटर‘च्या माध्यमातून थेट मंत्र्यांपर्यंत करता येतील, अशी व्यवस्था झाली आहे. ट्‌विटरवरील तक्रारीची तत्काळ दखल घेऊन अतिशय अल्प कालावधीत सोडवणूक करण्याचे स्पष्ट आदेशही दूरसंचार मंत्र्यांनी दिलेले असल्याने नागरिकांना याचा लाभ होणार आहे. 
 

सकारात्मक उपयोग 
काही दिवसांपूर्वी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलेने सहप्रवासी गुंडांची तक्रार ट्विट केल्यानंतर अवघ्या काही वेळात रेल्वे मंत्रालयाने दखल घेतली. त्यानंतर पुढच्या स्टेशनपर्यंत तर त्या महिलेला मदत मिळाली. लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान त्या महिलेच्या मदतीला धावून आले. 

दुसऱ्या एका घटनेत रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका महिलेने आपल्या लहानग्या बाळासाठी प्रवासात दूध मिळत नसल्याची तक्रार केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने दखल घेऊन त्या महिलेच्या बाळासाठी दूध उपलब्ध करून दिल्याची चांगली चर्चा झाली आहे. 
2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमाने प्रभावी प्रचार केला. प्रत्येक राज्यात सोशल मीडियाची विंग करून त्याद्वारे प्रभावी प्रचार यंत्रणा राबवत, आपली भूमिका जनसामान्यांपर्यंत पोचवली. 

काही महिन्यांपूर्वी क्राईम पेट्रोल या मालिकेत भरदुपारी घरात एकट्या असणाऱ्या वृद्ध महिलेची हत्या झाल्याची घटना दाखविण्यात आली. पोलिस तपासात नेमकी हत्या कोणी केली हे निष्पन्न होत नव्हते. या ठिकाणी राहणाऱ्या एका मुलीने या घटनेची माहिती व गुन्हेगारांची पद्धत आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली. तिच्या फेसबुक पेजवरील सदस्यांना अशी घटना पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले. त्यानंतर एका सोसायटीत काम मिळविण्याच्या बहाण्याने फिरणारे संशयित आढळल्याने फेसबुक पेजवरील एका सदस्याला संशय आला, त्याने ही माहिती तत्काळ पोलिसांना कळवली आणि गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले. 
 

चुकीचा वापर नकोच 
तंत्रज्ञान हे चांगलेच असते पण त्याचा वापर चांगल्या गोष्टीसाठी केला तर चांगले ठरते आणि त्याचा चुकीचा वापर केला तर ते घातक ठरते. प्रत्येक चांगल्या गोष्टींसोबत वाईटही येत असते. त्यामुळे सोशल मीडियाचा नीट वापर न करता कधी कधी लोकांच्या भावना भडकावण्यासाठीही केला जातो, याची अनेक उदाहरणे आपण नेहमी पाहत असतो. या अप्रत्यक्ष जगात वावरताना लांबची माणसे जवळ करण्याच्या प्रयत्नात आपण आपली जवळची माणसे लांब करत चाललो आहोत, हेही तितकेच खरे आहे. मात्र असे असले तरीही, सोशल मीडियाचा खरा अर्थ आहे, तो विधायक घटनांच्या बाबतीत शेअरिंग करणे होय. 
 

असा आहे फायदा 
जगातील कानाकोपऱ्यांत अगदी कमी वेळेत संवाद साधण्याचे माध्यम. 
विचारांची देवाणघेवाण करण्याचे, वेळ आणि पैशांची बचत करण्याचे माध्यम. 
एकाच वेळी अनेकांपर्यंत आपले म्हणणे, मत पोचविण्याचे प्रभावी माध्यम. 
जगाच्या कानाकोपऱ्यांतील कोणत्याही व्यक्तीशी तुमचा थेट संवाद होऊ शकतो. 
थेट संवादाचा फायदा वेगवेगळ्या क्षेत्रातील तुमचे ज्ञान वाढवण्यापासून व्यवसायवृद्धीपर्यंत कसाही होऊ शकतो.
सोशल मीडियावरील व्यक्तीशी संपर्क करण्यापूर्वी तुम्ही प्रोफाईल वाचू शकता. आवडीनिवडी जाणून घेऊ शकता. फोटोवरून त्यांच्या स्वभावाविषयी अंदाज बांधू शकता. या सर्व गोष्टींचा फायदा तुम्हाला त्या व्यक्तीशी थेट संवाद साधताना होतो. 

Web Title: social touch