औरंगाबादेत सिमेंट रस्त्यावर मातीचे प्रयोग!

माधव इतबारे
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

क्रांती चौक-रेल्वेस्टेशन नव्या रस्त्यावर पडले खड्डे 

औरंगाबाद - महापालिकेने क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन रस्ता तब्बल 30 ते 32 कोटी रुपये खर्च करून सिमेंट क्रॉंक्रिटचा केला आहे. एवढी मोठी रक्कम खर्च झालेला हा शहरातील एकमेव रस्ता असून, अवघ्या काही वर्षांतच या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्ता सिमेंटचा असताना चक्क माती टाकून हे खड्डे बुजविण्याचा प्रयोग प्रशासनातर्फे सध्या सुरू आहे. 

शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. परतीच्या पावसाने तर रस्त्यांचे आणखीच हाल झाले आहेत. सध्या महापालिकेचा कारभार रामभरोसे असून, या खड्ड्यांकडे पाहण्यासाठी कोणालाच वेळ नाही. वॉर्ड कार्यालयामार्फत मात्र अधिकारी आपापल्या परीने थातूरमातूर कामे करीत आहेत. महापालिकेने क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्याचे काही वर्षांपूर्वी क्रॉंक्रिटीकरण केले आहे. त्यावर तब्बल 30 ते 32 कोटी रुपये खर्च करण्यात आला. या रकमेवरून त्यावेळी बराच वाद झाला. मात्र, शिवसेनेने सत्तेच्या बळावर निधी खर्च करीत रस्त्याचे काम पूर्ण केले. 

या रस्त्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असे नावही देण्यात आले. मात्र, काही वर्षांतच या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक त्रस्त आहेत. महापालिकेने काही महिन्यांपूर्वी डांबरी रस्त्यावरील खड्डे सिमेंट क्रॉंक्रिटने बुजविले होते. आता सिमेंट रस्त्यावरील खड्डे मात्र माती टाकून बुजविले जात आहेत. मंगळवारी (ता.12) कामगारांनी टेंपो भरून माती आणून या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये टाकली. 

आम्ही आदेशाचे पालन करणारे 
मातीमुळे खड्‌डे बुजणार का? असा प्रश्‍न कर्मचाऱ्यांना केला असता, आम्ही आदेशाचे पालन करणारे आहोत. आम्हाला माती टाकून खड्डे बुजविण्याचे आदेश मिळाले, आम्ही काय करणार? असा प्रश्‍न संबंधित कर्मचाऱ्यांनी केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soil experiment on cement roads in Aurangabad!