घनकचरा प्रकल्प डिसेंबरअखेर पूर्ण करा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

जालना - शहरासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून हाती घेतलेल्या सामनगाव येथील घनकचरा प्रकल्पाचे रखडलेले काम डिसेंबर 2017 अखेर कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करा, अशी सक्त सूचना नगरपालिका प्रशासन संचालनालय आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

जालना - शहरासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून हाती घेतलेल्या सामनगाव येथील घनकचरा प्रकल्पाचे रखडलेले काम डिसेंबर 2017 अखेर कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करा, अशी सक्त सूचना नगरपालिका प्रशासन संचालनालय आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. 

श्री. सिंह यांनी सोमवारी (ता. 24) जालना शहरात येऊन नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांची व प्रकल्पांची पाहणी केली. सुरवातीला श्री. सिंह यांनी शहरात नगरोत्थान अभियानांतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली. हे काम वेळेत व गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शहरी ग्रामीण जीवनोन्नती अभियान व दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत सुरू असलेले बचत गटांची कामे, राबविण्यात येत असलेले उपक्रम, पालिकेच्या या उपक्रमास मिळणारे सहकार्य याची माहिती त्यांनी घेतली. पालिका प्रशासनाच्या यासंबंधीच्या अडीअडचणी त्यांनी जाणून घेतल्या. शहर स्वच्छतेच्या कामाची माहिती घेतल्यानंतर श्री. सिंह यांनी आपला मोर्चा थेट सामनगाव घनकचरा प्रकल्पाकडे वळविला. तांत्रिक बाबींच्या पूतर्तेअभावी घनकचरा प्रकल्पाचे काम मागील काही वर्षांपासून रखडल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना दिली. यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. स्वच्छता हा शासनाच्या अजेंड्यावरील प्रमुख मुद्दा असल्याने त्या संबंधित प्रकल्पाचे काम अनेक वर्षांपासून रखडणे योग्य नसल्याचे ते म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रकल्पातील मशिनरी व अन्य साहित्याची त्यांनी पाहणी केली. आवश्‍यक बाबींची पूर्तता करून घनकचरा प्रकल्पाचे काम डिसेंबरअखेर मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या पाहणी दौऱ्यात सिंह यांच्यासोबत उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, जिल्हा नगरपालिका प्रशासनाचे केशव कानपुडे, पालिकेचे अभियंता श्री. अग्रवाल, श्री. अडसिरे, स्वच्छता विभागप्रमुख श्री. बिटले आदींची उपस्थिती होती. 

शहरात होणार दोन रात्र निवारे 
रात्रीच्या वेळी कुठेही झोपणाऱ्या बेघर नागरिकांसोबत, गरजूंसाठी शहरात दोन रात्र निवारे बांधण्यात येणार आहेत. श्री. सिंह यांनी जालना दौऱ्यात यासाठी डबलजीन व मोतीबाग परिसरातील अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहाची पाहणी केली. या रात्र निवाऱ्यासाठी पालिकेने सविस्तर प्रस्ताव सादर करावा. त्यानंतर रात्र निवारा बांधण्यासाठी लवकरच अनुकूल निर्णय घेतला जाईल, असे सिंह यांनी सांगितल्याची माहिती मुख्याधिकारी श्री. खांडेकर यांनी दिली. 

Web Title: solid waste project