कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने जवानाला वीरमरण, उद्या जालना जिल्ह्यात अंत्यसंस्कार

दीपक सोळंके
Tuesday, 22 December 2020

जालना जिल्ह्यातील जवानाला कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण आले आहे. 

भोकरदन (जि.जालना) : भोकरदन तालुक्यातील भिवपूर येथील भारतीय सैन्य दलातील जवान गणेश संतोष गावंडे (वय ३८) हे पुणे येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आले आहे. त्यांना सोमवारी (ता.२१) हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यातच त्यांचे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील भिवपूर येथील जवान गणेश गावंडे हे पंधरा वर्षांपासून भारतीय सैन्यदलात मराठा बटालियन इन्फंट्रीमध्ये सेवा बजावत होते. मात्र, अवघ्या चार दिवसांपूर्वीच त्यांची बदली इतर ठिकाणाहून पुणे येथे मराठा बटालियन रेस कोर्स पुणे येथे झाली होती.

 

 

त्या ठिकाणी ते सेवा बजावत असताना सोमवारी चौथ्या दिवशी सकाळी सहा वाजे दरम्यान त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी,दोन मुलं व तीन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच भिवपुर गावासह तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे. बुधवारी (ता.२३) सकाळी नऊ वाजता त्यांच्या मूळगावी भिवपुर येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solider Died In Cardiac Attack Bhivpur Jalna