मुलाच्या पगारातून पोटगीची रक्कम आईच्या खात्यात

alimony
alimony

लातूर : महावितरणमध्ये नोकरीला असलेल्या पतीच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर असलेल्या मुलाने आईच्या पालनपोषणाची जबाबादारी नाकारली. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी आईला दरमहा दीड हजार रूपये पोटगी देण्याचे आदेश मुलाला दिले होते. ही रक्कम कमी असल्याने त्यात वाढ करण्याची मागणी आईने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी वाढीव पोटगी मंजूर करून पोटगीची रक्कम महावितरणमध्ये कार्यरत मुलाच्या पगारातून दरमहा कपात करून आईच्या बॅंक खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.   

विरहनुमंतवाडी (टाकेनगर) मधील रहिवाशी विमलबाई पुंडलिक शिंदे यांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे अपिल केले होते. महावितरण कंपनीत कार्यरत श्रीमती शिंदे यांच्या पतीचे वीस वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी मधला मुलगा संजय याला नोकरी मिळाली. यासाठी श्रीमती शिंदे यांनी सहमती दिली. श्रीमती शिंदे यांचा थोरला मुलगा आजारी तर धाकटा मुलगा व्यसनी असल्याने उदरनिर्वाहाची जबाबदारी संजयवर होती. मात्र, त्याने त्यास नकार दिला. त्यापुढे जाऊन आईच्या नावावरील घर फसवून स्वतःच्या पत्नीच्या नावाने केले. यामुळे श्रीमती शिंदे यांनी मुलगा संजय याच्याकडून पोटगी मिळावी, यासाठी माता - पिता व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 नुसार लातूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. अर्जाच्या सुनावणीत उपविभागीय अधिकाऱ्यांनी श्रीमती शिंदे यांना दरमहा दीड हजार रूपये पोटगी देण्याचे आदेश मुलगा संजय याला दिले होते. मात्र, ही पोटगी कमी असून त्यातून उदरनिर्वाह भागणे अशक्य असल्याने श्रीमती शिंदे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निकालाविरूद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले व वाढीव पोटगी देण्याची मागणी केली.

जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्यासमोर या अपिलाची सुनावणी झाली. एकुण परिस्थिती लक्षात घेता आईला उदरनिर्वाहासाठी खर्च देण्याची पूर्ण जबाबदारी मुलगा संजय याचीच असल्याचे पुढे आले. श्रीमती शिंदे वयोवृद्ध असल्याने त्यांना मंजूर केलेली पोटगी कमी असल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशात बदल करून जिल्हाधिकाऱ्यांनी बदल करून श्रीमती शिंदे यांना दरमहा पाच हजार रूपये पोटगी देण्याचे मुलगा संजय याला दिले. संजय याच्या वेतनातून पोटगीचे दरमहा पाच हजार रूपये कपात करून ते श्रीमती शिंदे यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत. या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी श्रीमती शिंदे यांचा बॅंक खाते क्रमांक आयएफसी कोडसह नमूद केला आहे, हे विशेष होय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com