घराची...पोरांची...याद येतीया, पर करावं काय? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

उमरगा - घराची... पोरांची... याद येतीया, पर करावं काय? पोटासाठी घरदार सोडून यावंच लागतंय... थंडीत, उन्हात ऊस तोडायचं काम करावंच लागतंय... ही व्यथा आहे ऊसतोड कामगारांची. आणि ही व्यथा जाणून घेतलीय आठवीच्या विद्यार्थ्यांनी.

उमरगा - घराची... पोरांची... याद येतीया, पर करावं काय? पोटासाठी घरदार सोडून यावंच लागतंय... थंडीत, उन्हात ऊस तोडायचं काम करावंच लागतंय... ही व्यथा आहे ऊसतोड कामगारांची. आणि ही व्यथा जाणून घेतलीय आठवीच्या विद्यार्थ्यांनी.

तालुक्‍यातील माडज येथील ग्रामीण प्रशालेचे शिक्षक बालाजी इंगळे यांनी आठवीच्या विद्यार्थ्यांना ऊसतोड कामगारांची भेट घडवून आणली आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. हे कामगार येतात कुठून, मजुरी किती मिळते, घरदार सोडून राहताना काय वाटते, मुलांच्या शिक्षणाचे काय करता, मुकादम काही त्रास देतो का, उसाच्या फडात सणवार कसे साजरे करता, कोणी आजारी पडले तर काय करता, असे वेगवेगळे प्रश्न विचारून ऊसतोड कामगारांचे जीवन व त्यांच्या व्यथा आणि वेदना विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या. 

कामगारांसोबत असलेल्या मुलांना आमच्या शाळेत पाठवा, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. यावर संक्रांतीनंतर मुले शाळेसाठी गावाकडे जाणार असल्याचे कामगारांनी सांगितले. कष्ट, मेहनत, चिकाटी आणि मुख्य म्हणजे शिक्षण घेणे आवश्‍यक आहे, हे आम्ही या ऊसतोड कामगारांकडून शिकलो, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. या उपक्रमाविषयी सांगताना शिक्षक बालाजी इंगळे म्हणाले, की विद्यार्थ्यांना भटक्‍या जमातींचे आयुष्य समजून घेता यावे, कष्ट आणि मेहनतीची काय किंमत असते हे विद्यार्थ्यांना कळावे, यासाठी हा उपक्रम राबविला. या उपक्रमामुळे श्रमप्रतिष्ठेचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजले आहे.  
 

Web Title: soreness of sugarcane workers