उस्मानाबाद, लातूर, बीडच्या काही भागांत पावसाची हजेरी
सारा पावसाळा खंडित स्वरूपात गेल्यामुळे दुष्काळाचे काळे ढग जमा झालेले असताना उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांच्या काही भागात गुरुवारी (ता. 4) परतीचा पाऊस झाला. सोयाबीन काढणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांची धावपळ उडाली. "ऑक्टोबर हीट'मुळे त्रस्त झालेल्यांना काहीसा दिलासा मिळाला.
उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यात दुपारी गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे ऊस, तूर व सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. सोयाबीन काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. बुधवारी (ता.3) मध्यरात्री उमरगा, तुरोरी, माकणी, बलसूर, उस्मानाबाद तालुक्यातील उपळा, तेर, ढोकी, जहागीरदारवाडी, कळंब तालुक्यातील माळकरंजा, भाटशिरपुरा, पिंपळगाव परिसरात पावसाने हजेरी लावली. लातूर शहरात आज सकाळी पंधरा मिनिटे पाऊस झाला. रेणापूर तालुक्यातील कामखेडा परिसरात काहीकाळ गारपीट झाली. बीड जिल्ह्यात जूनपासून कालपर्यंत (ता. 3) पावसाच्या एकूण 124 दिवसांपैकी 94 दिवस कोरडे गेल्यानंतर आज काही भागांत परतीच्या पावसाने हजेरी लावली.
|