सोयाबीनच्या क्षेत्रात वीस वर्षांत साठपटीने वाढ!

विकास गाढवे
मंगळवार, 23 मे 2017

मराठवाड्यातील स्थिती; अन्नधान्याऐवजी शेतकऱ्यांचा कल नगदी पिकांकडे

मराठवाड्यातील स्थिती; अन्नधान्याऐवजी शेतकऱ्यांचा कल नगदी पिकांकडे
लातूर - पिके घेण्याची शेतकऱ्यांची मानसिकता बदलली असून अन्नधान्याऐवजी शेतकऱ्यांचा नगदी पिके घेण्याकडे कल वाढला आहे. यातूनच ज्वारी व बाजरीची जागा वीस वर्षांनंतर आता सोयाबीन व कापसाने घेतल्याचे चित्र मराठवाड्यात दिसून येत आहे. पीक क्षेत्रात झालेल्या बदलाचा फटका चाऱ्याचे उत्पादन, पशुधनाच्या संख्येत घटीसह जमिनीच्या आरोग्यालाही बसला आहे.

येत्या खरीप हंगामाची तयारी करताना कृषी विभागाने या बदलाचा आढावा घेतला आहे. पीकक्षेत्रातील बदल मांडताना मराठवाड्यातील 1996-1997 या खरीप हंगामातील पिकाच्या क्षेत्राची गेल्या वर्षीच्या खरिपातील पिकाच्या क्षेत्राशी तुलना करण्यात आली आहे. यातूनच वीस वर्षात पीक क्षेत्रात आमूलाग्र बदल झाल्याचे सांगत अन्नधान्याऐजी शेतकऱ्यांचा नगदी पिके घेण्याकडे कल वाढल्याचा निष्कर्ष विभागाने काढला आहे. मराठवाड्यात 49 लाख अकरा हजार हेक्‍टरवर खरिपाचे क्षेत्र आहे. यात 1996 - 1997 च्या खरीप हंगामात भाताचे क्षेत्र एक लाख हेक्‍टर होते. ते मागील वर्षीच्या खरिपात आठ हजार हेक्‍टरवर आले आहे. ज्वारीचे सर्वाधिक आठ लाख 29 हजार हेक्‍टर असलेले क्षेत्र एक लाख ऐंशी हजार हेक्‍टर झाले आहे. ज्वारीसोबत बाजरीचीही अशीच स्थिती आहे. बाजरीचे क्षेत्र चार लाख 90 हजार हेक्‍टरवरून वीस वर्षात केवळ एक लाख 71 हजार हेक्‍टर झाले आहे. भुईमुगाच्या क्षेत्रातही मोठी घट झाली आहे. वीस वर्षांपूर्वी 78 हजार हेक्‍टर असलेले भुईमुगाचे क्षेत्र वीस हजार हेक्‍टर झाले आहे. वीस वर्षात सोयाबीन, कापूस व मक्‍याच्या क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. मक्‍याचे एक लाख 88 हजार हेक्‍टर असलेले क्षेत्र मागील वर्षात तीन लाख तीन हजार हेक्‍टर झाले आहे.

सोयाबीन व कापसाच्या क्षेत्रात वाढ
सर्वाधिक सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. पूर्वी केवळ 28 हजार हेक्‍टरवर असलेले सोयाबीनच्या पिकाचे क्षेत्र 17 लाख 66 हजार हेक्‍टर झाले आहे. वीस वर्षात 63 पटीने वाढ झाली आहे. सोयाबीननंतर नगदी पीक म्हणून कापसाच्या पिकाला शेतकरी प्राधान्य देत आहेत. यातूनच वीस वर्षापूर्वी नऊ लाख 77 हजार हेक्‍टरवर असलेले कापसाचे क्षेत्र आता चौदा लाख 45 हजार हेक्‍टरपर्यंत वाढले आहे. कापसाची जागा आता सोयाबीनने घेतली आहे.

Web Title: soybean field increase