उमरगा : सोयाबीन बियाणांचा मोबादला मिळण्यासाठी होतेय दिरंगाई, ‘महाबिज’कडून मिळेना प्रतिसाद

0soya_20seeds.1
0soya_20seeds.1

उमरगा (जि.उस्मानाबाद) : खरीप हंगामात पेरणी केलेल्या सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने जवळपास एक हजार शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. शेतकऱ्यांच्या तक्रारीमुळे खुद्द राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे शेतात येऊन पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. कृषी विभाग व समितीचे पंचनामे करून ९७८ शेतकऱ्यांचा अहवाल वरिष्ठांना पाठवला. काही बियाणे कंपन्यांनी मोजक्या शेतकऱ्यांना मोबादला दिला. मात्र बहुतांश शेतकऱ्यांना बियाणे नुकसानीचा मोबदला मिळत नाही.


तालुक्यात गेल्या चार-पाच वर्षांपासून कधी अवर्षण तरी कधी अतिवृष्टीने खरीप पिकाचा हंगाम वाया गेलेला आहे. यंदाच्या खरिप पेरण्यासाठी वेळेवर व मुबलक पाऊस झाला नव्हता. तरीही शेतकऱ्यांनी पेरणीला गती दिली. सर्वाधिक क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली. मात्र नेमके उलटे घडले आहे. महागडे बियाणे खरेदी करून पेरणी केलेले सोयाबीन उगवले नाही. त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. तरीही मेहनत व आर्थिक पदरमोड करुन सोयाबीनचे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला. परंतू पुन्हा अतिवृष्टीने सोयाबीन पाण्यात गेले. सोयाबीनच्या उत्पन्नाबाबत यंदा शेतकरी आर्थिक संकटात असताना न उगवलेल्या बियाणांचा मोबादला देण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी लोटला तरी संपूर्ण शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही.

मोजक्याच शेतकऱ्यांना मिळाला मोबादला
तालुक्यात महाबीज, बसंत ॲग्रोटेक, बन्सल आणि ग्रीन गोल्ड, कृषिधन या कंपन्याचे सोयाबीनच्या बियाणांची पेरणी शेतकऱ्यांनी केली. न उगवलेल्या बियाणांच्या क्षेत्राची पाहणी करून पंचनामे झाले. समितीने ९७८ शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल दिला. त्यात महाबीजच्या ४५८ तक्रारी होत्या. काही कंपन्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांना मोबाईला दिला. बियाणे बदलुनही दिले, परंतू संबंधित कंपन्याच्या विरूद्ध गुन्हे दाखल झाल्याने बराच गोंधळ उडाला.

कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन एफआयआर दाखल करण्यावर स्थगिती मिळवली अशी माहिती सांगण्यात आली. परिणामी या सर्व प्रकारात बहुतांश शेतकऱ्यांना मोबादला मिळणे थांबले. आता शेतकऱ्यांना ग्राहक मंचचा पर्याय करावा लागेल अशी स्थिती दिसत आहे. दरम्यान महाबीज नियमावलीनुसार आता ६४ शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर केले आहे. त्यातील दहा शेतकऱ्यांना मोबदला दिला आहे. काही शेतकऱ्यांकडे पिशव्या, टॅग अथवा पावत्या नसल्याने अडचणी येत आहेत.
 

६४ शेतकऱ्यांना मोबादला देण्याची महामंडळाकडून मंजूरी आली आहे. पंचनाम्याच्या यादीत नाव असले म्हणजे लगेच मोबादला मिळतो असे नाही. त्यासाठी महामंडळाच्या नियमावली आहेत.
- आर.एम. माने, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, उस्मानाबाद


सोयाबीन उगवले नसल्याचे पंचनामे झाले. सर्व क्षेत्रात शंभर टक्के नुकसान झाले. मोबादला मिळण्यासाठी बियाणे खरेदीच्या पावत्या, पंचनाम्याची प्रत सर्व काही आमच्याकडे आहे. मात्र महाबीजकडुन मोबाईला देण्यासाठी विलंब केला जातोय.
- सुभद्राबाई काळे, शेतकरी, माडज

 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com