'डीजे' लावाल तर जेलमध्ये जाल- पोलिस अधिक्षक

SP mane Threat ganesh Mandal for DJ sound in latur
SP mane Threat ganesh Mandal for DJ sound in latur

लातूर- ‘गणेशोत्सवाच्या काळात मागील वर्षी लातूर जिल्हा 90 टक्के डीजेमुक्त होता, असे म्हटले जाते. पण नव्वदच का, शंभर टक्के का नाही? यंदा डीजे किंवा ध्वनिवर्धकाच्या भिंती लावायच्या नाही म्हणजे नाही. कोणीही याबाबतची मागणी किंवा आग्रह करू नका. ध्वनिवर्धकाच्या भिंती लावून कायद्याचे उल्लंघन कराल तर आम्हाला तुमच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी लागेल’, अशा शब्दांत पोलिस अधिक्षक राजेंद्र माने यांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना सुनावले. आम्ही ध्वनिवर्धकाच्या भिंती वापरणार नाही, असे लेखी हमीपत्र घेऊनच यंदा गणेश मंडळांना परवानगी दिली जाणार अाहे, असेही त्यांनी सांगितले. 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाच्या वतीने प्रथमच पूर्वतयारी बैठक बुधवारी आयोजित करण्यात अाली होती. या बैठकीला शहरातील आणि जिल्ह्यातील गणेश मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, खासदार सुनील गायकवाड, महापौर सुरेश पवार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महापालिका आयुक्त कौस्तूभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरूके, अपर पोलिस अधिक्षक काकासाहेब डोळे, शैलेश लाहोटी उपस्थित होते.  

माने म्हणाले, ‘ध्वनिवर्धकाच्या भिंती लावून न्यायालयाच्या आदेशाचा अनादर होणार नाही, हे प्रत्येकाने पाहिले पाहिजे. अशा प्रकारामुळे ध्वनिप्रदुषणाची पातळी वाढते. लहानांना-ज्येष्ठांना त्रास होतो. मात्र, याचा विचार केला जात नाही. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून लातूर जिल्हा ध्वनिवर्धकाच्या भिंतीमुक्त करू. प्रदुषणासंदर्भातील सर्व नियम पाळू. मंडप कसा असावा, याबाबतच्या नियमांचेही गणेश मंडळानी पालन करावे.’ 

शिवाय, ‘गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांनी पोलिसांच्या संपर्कात राहावे. काही आक्षेपार्ह माहिती मिळाली तर ती प्रथम पोलिसांनी सांगून खात्री करून घ्यावी. समाजात शांतता, सुव्यवस्था कायम कशी राहील, हे पहावे. आपल्याकडे जेवढे गणेश मंडळे अाहेत, तेवढे पोलिस आपल्याकडे नाहीत. त्यामुळे मंडळाची सुरक्षा स्वत: पाहावी. कुठलाही घातपात, अपघात होणार नाही याबाबत दक्ष राहायला हवे. वेगवेगळे उपक्रम राबवून मंडळाची वाटचाल विकासात्मक कामांकडे घेऊन जावी.’ अशा सूचनाही माने यांनी यावेळी केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com