सेरेब्रल पाल्सी विद्यार्थीही होणार आता मॅट्रीक 

latur
latur

लातूर : दिव्यांग विद्यार्थ्याप्रमाणे सेरेब्रल पाल्सी आणि बहुविकलांग विद्यार्थीही आता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येणार आहेत. त्यांना दहावी अर्थात मॅट्रीकची परीक्षा देता येणार आहे. यासाठी अशा विद्यार्थ्यांची विशेष शाळा असलेल्या हरंगुळ (बु. ता. लातूर) येथील संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्राने केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या विशेष शाळेला दहावीसाठी मान्यता प्रदान केली असून ही मान्यता मिळालेली राज्यातील ही पहिलीच शाळा आहे. शाळेतील केंद्रातून या शाळेसह राज्यातील सेरेब्रल पाल्सी व बहुविकलांग विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा देता येणार आहे.   

दिव्यांगांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकारकडून मोठे प्रयत्न करण्यात येत आहेत. यात अंध, अपंग, अस्थिव्यंग आदी विद्यार्थ्यांसाठी मंडळाचा दहावीचा अभ्यासक्रम आहे. सेरब्रल पाल्सी व बहुविकलांग विद्यार्थी या अभ्यासक्रमापासून वंचित होते. विविध ठिकाणी असलेल्या केंद्रात मागील काही वर्षापासून विद्यार्थ्यांत केवळ स्वावलंबनाची कौशल्य रूजवण्याचे प्रयत्न सुरू होते. विद्यार्थ्यांचा बुद्धांक चांगला असूनही ते शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात नव्हते. किंबहुना त्यासाठी कोणीही प्रयत्न केले नव्हते. येथे 2006 मध्ये स्थापन झालेल्या संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्रांने यासाठी प्रभावी प्रयत्न केले. सध्या केंद्रात साठहून अधिक विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे दिले जात आहेत. या विद्यार्थ्यांनाही दिव्यांग विद्यार्थ्यांप्रमाणे दहावीची परीक्षा देता यावी, म्हणून संवेदना केंद्राने मंडळाला (बोर्डाला) प्रस्ताव दिला होता. यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अभ्यासक्रमातील काही विषयात बदल करून या विशेष विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम देण्याची मागणी करण्यात आली. मंडळाने प्रस्तावाची छाननी करून तसेच विद्यार्थी संख्येची अट शिथिल करून शाळेला दहावीची मान्यता बहाल केली आहे.

असा आहे अभ्यासक्रम
विशेष अभ्यासक्रमात मराठी एकच भाषा असून इंग्रजी व हिंदीऐवजी कार्यानुभव विषय आहे. यातून विद्यार्थ्यांना कार्य प्रशिक्षण देण्याचा हेतू आहे. गणिताऐवजी सातवीचे अंकगणित असून सामान्य विज्ञानाऐवजी आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र व शरिरशास्त्र विषय आहेत. इतिहास व भूगोल मात्र, दहावीचाच आहे. दहावीची मान्यता मिळालेले संवेदना ही राज्यातील सेरेब्रल पाल्सी व बहुविकलांग विद्यार्थ्यांची पहिली शाळा असून राज्यातील अशा विद्यार्थ्यांना 17 नंबरचा फॉर्म भरून शाळेतील केंद्रांतून दहावीची परीक्षा देता येणार आहे.

मंत्र्यांच्या उपस्थितीत मंडळ मान्यता
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडळाने शाळेला मान्यता बहाल केली. मंडळाचे विभागीय सचिव शशीकांत हिंगोणेकर, डॉ. अशोक कुकडे, अॅड. जगन्नाथ चिताडे, डॉ. संजय गवई, डॉ. सुकुमार करे, सुरेश पाटील, मुख्याध्यापिका दिपा पाटील, व्यंकट लामजने यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या शाळेतून यंदा तीन विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र असून येत्या काळात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com