थुंकणाऱ्यांविरुद्ध आता साथरोग कायद्यानुसार कारवाई

Latur News
Latur News

लातूर : कोरोनाचा संसर्ग थुंकीच्या माध्यमातून होत असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी पान, सुपारी व तंबाखू खाऊन थुंकणाऱ्या, तसेच धूम्रपान करणाऱ्यांविरुद्ध आणखी कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांविरोधात चार कायदे, तसेच दहा कलमांनुसार कारवाईची मुभाही सरकारने विविध यंत्रणांना दिली आहे.


राज्यात गुटखा, तंबाखू उत्पादन, वाहतूक व विक्रीला बंदी आहे. असे असले तरी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व धूम्रपान करण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. दुष्परिणामामुळे कर्करोग, श्वसनाचे आजार, पुनरुत्पादन संस्थेचे आजार, पचनसंस्थेचे आजार तसेच क्षयरोग, स्वाइन फ्लू, न्यूमोनिया आदी आजारांचा फैलाव होतो. आता कोरोनाचाही संसर्ग थुंकीच्या माध्यमातून होत असल्याचे निष्पन्न झाल्याने सरकारने सावध भूमिका घेत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व धूम्रपान करणाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार अशा लोकांविरुद्ध आधीच्या कायद्यासोबत साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

लातूर जिल्ह्याचा सुपूत्र परतला देशात, सुरेश प्रभूंच्या एका फोनने फ्रान्सने केली...

या ठिकाणी आदेश लागू
राज्यातील शासकीय, निमशासकीय, खासगी, विविध मंडळे, परिमंडळे, महामंडळे, औद्योगिक, व्यावसायिक, वाणिज्य, शैक्षणिक, वैद्यकीय, रहिवासी क्षेत्र व संकुले, रेल्वेस्थानके, बसस्थानके, जलवाहतूक स्थानके, बंदर क्षेत्र, न्यायालयीन संस्था, देवस्थाने, बगीचे, पर्यटनस्थळे, शॉपिंग मॉल, तरण तलाव, सिनेमागृहे, व्यायामशाळा, रस्ते, बाजारपेठा, हॉटेल्स आदी संस्था, आस्थापना व सार्वजनिक ठिकाणी व आवारातही सरकारचे हे आदेश लागू असल्याचे निर्णयात म्हटले आहे.


सक्षम अधिकाऱ्यांनाही अधिकार
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार जिल्हाधिकारी तसेच महापालिका क्षेत्रात आयुक्तांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित केले आहे. शुक्रवारच्या निर्णयानुसार सरकारने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व धूम्रपान करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार या सक्षम अधिकाऱ्यांना प्रदान केले आहेत. यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांविरोधात आता व्यापक प्रमाणात कारवाई होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com