बेफाम स्पोर्टस्‌ बाईकरने घेतला व्यवस्थापकाचा बळी! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - वेगवान बेभान स्पोर्टस्‌ बाईकरने रस्ता ओलांडणाऱ्या व्यवस्थापकाला उडवले. त्यानंतर तो कारवर धडकला. या भीषण अपघातात व्यवस्थापक जागीच ठार झाला असून, बाईकचालक तरुण गंभीर जखमी झाला. ही गंभीर घटना बुधवारी (ता. 23) सायंकाळी सातच्या सुमारास सेंट फ्रान्सिस स्कूलजवळ घडली. 

औरंगाबाद - वेगवान बेभान स्पोर्टस्‌ बाईकरने रस्ता ओलांडणाऱ्या व्यवस्थापकाला उडवले. त्यानंतर तो कारवर धडकला. या भीषण अपघातात व्यवस्थापक जागीच ठार झाला असून, बाईकचालक तरुण गंभीर जखमी झाला. ही गंभीर घटना बुधवारी (ता. 23) सायंकाळी सातच्या सुमारास सेंट फ्रान्सिस स्कूलजवळ घडली. 

घाटीतील डॉक्‍टरांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय भगवानदास अग्रवाल (वय 55, रा. विष्णूनगर, त्रिमूर्ती चौक) असे या अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. ते अग्रसेन भवन येथे वसतिगृहाचे व्यवस्थापक होते. शंतनू देसाईराव देशमुख (वय 25, रा. मु. पो. खंडोबा टेकडी, ता. मानवत, जि. परभणी) असे गंभीर जखमी दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. तो शहरात शिक्षणानिमित्त राहत होता. तो सायंकाळी सातच्या सुमारास सेव्हन हिलकडून स्पोर्टस्‌ बाईकने आकाशवाणीकडे जात होता. त्यावेळी कामावरून घरी परतणारे विजय अग्रवाल एसएफएस स्कूलसमोरून रस्ता ओलांडत होते. अचानक समोर व्यक्ती दिसल्याने दुचाकीस्वार गडबडला. त्याने करकच्चून ब्रेक दाबले; परंतु अग्रवाल यांना दुचाकीचा जबर धक्का बसला. अपघात एवढा भीषण होता की, अग्रवाल दणकन आपटून जागीच ठार झाले. तत्पूर्वी दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने तो डाव्या बाजूला उभ्या कारवर आदळला व जमिनीवर कोसळला. यात तो गंभीर जखमी झाला. ही बाब समजताच जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनीष कल्याणकर, सहायक फौजदार हिवाळे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी पोचले. त्यांनी दोघांनाही एका खासगी रुग्णालयात हलवले. परंतु विजय अग्रवाल मृत झाल्याने त्यांना घाटीत दाखल केले. या घटनेनंतर जवाहरनगर पोलिसांनी अपघातग्रस्त स्पोर्टस्‌ बाईक जप्त केली. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद सुरू होती. 

आयुष्यच "ब्रेक' 

भरधाव बाईकरने वाहतूक नियमांचा भंग करून अग्रवाल यांना धडक दिली. त्याने स्वत:वर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेग व आवेशाच्या ओघात त्याने अग्रवाल यांचे आयुष्यच "ब्रेक' केले. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाइकांनी घाटीत धाव घेतली. त्यावेळी नातेवाइकांना शोक अनावर झाला. 

याच ठिकाणी दुसरा अपघात 
भरधाव दुचाकीस्वाराने मंगळवारी दुपारी एका पादचारी वृद्धाला धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले पण तेथे वाहतूक पोलिस असल्याने लगेचच मदत मिळाली होती. याच ठिकाणी दुसऱ्या दिवशीही अपघात घडला असून, वेगामुळे पायी जाणाऱ्यांची रहदारी कठीण बनली आहे. 

बेफाम बाईकर्सवर कारवाई हवी 
शहरात बेफाम वेगाने धावणाऱ्या बाईकर्सची मोठी संख्या असून कॅनॉट प्लेस तसेच जालना रस्त्यावर त्यांचा सतत धुमाकूळ असतो. अशा बाईकर्सविरुद्ध ठोस कारवाई केली जात नाही. त्यांची चंगळ होत असली तरी सामान्यांचा, पादचाऱ्यांचा रस्त्यातच जीव जात आहे. यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई करायला हवी. 

रस्त्यावर चालताना जीव मुठीत 
नियमभंग करून बेफाम धावणारी वाहने, त्यांच्यावर नसलेला चाप, रात्रीच्या वेळी उघडझाप करणारे दिवे यामुळे रस्त्यावर चालणे धोक्‍याचे झाले आहे. बाईकर्सना ना पोलिसांची भीती, ना पादचाऱ्यांची काळजी. अशात पायी जाणाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. यात वृद्धांची मात्र मोठी परवड होत आहे.

Web Title: sports bikers accident