कर्तव्यतत्पर अधिकाऱ्याची ‘एक्‍झिट’

संजय वनवे
संजय वनवे

औरंगाबाद - वडील पुणे येथील, तर आई शहरात खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांच्या देखभालीत कुठलीही कसर राहू नये, ते लवकर बरे व्हावेत, म्हणून प्रयत्नशील असलेल्या क्रीडा अधिकारी मुलाला काळाने हिरावले. आईसाठी रुग्णालयात डबा देऊन येताना २९ डिसेंबरला चारचाकी वाहन त्यांच्या दुचाकीला धडकले. यानंतर शर्थीचे उपचार सुरू असताना बुधवारी (ता. नऊ) रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची एक्‍झिट चटका लावणारी ठरली. 

संजय शंकरराव वनवे (वय ४५, नागेश्‍वरवाडी) असे मृताचे नाव असून ते जालना येथे क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत होते. सुमारे सतरा वर्षे त्यांनी क्रीडा क्षेत्राची सेवा बजावली. त्यांचे वडील पुणे येथील, तर आई धूत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. जालना येथून नोकरीवरून घरी आल्यानंतर ते धूत हॉस्पिटलमध्ये आईसाठी डबा घेऊन गेले. तेथून रात्री परतताना आकाशवाणीजवळ त्यांच्या दुचाकीला मागून आलेल्या भरधाव इनोव्हाने धडक दिली. यानंतर इनोव्हाचालक पसार झाला. या अपघातात वनवे यांच्या डोक्‍याला इजा होऊन ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, त्यांना एका खासगी रुग्णालयात तात्काळ नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संतोष नवनाथ डोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार इनोव्हाचालकावर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.  

दिलखुलास व्यक्तिमत्त्व
संजय वनवे अत्यंत मनमिळावू, दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. माणसे जोडण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या एक्‍झिटने अनेकांना धक्का बसला. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरही अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

उपचारादरम्यान वनवे यांचा मृत्यू झाल्याची बाब समजताच आईवडिलांना अतीव दुःख झाले. अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत. वनवे यांच्यावर पुष्पनगरी स्मशानभूमीत गुरुवारी अंत्यसंस्कार केले. यावेळी विविध क्षेत्रांतील व्यक्तींची मोठी उपस्थिती होती.

व्हॉलीबॉल, ॲथलेटिक्‍समध्ये प्रावीण्य
संजय वनवे हे व्हॉलीबॉल व अथलेटिक्‍स या क्रीडा प्रकारात निपुण होते. महाविद्यालयीन जीवनात ते उत्कृष्ट खेळाडू म्हणून नावारूपास आले होते. या खेळात त्यांनी राज्यस्तरावर पारितोषिके मिळविली होती. यानंतर क्रीडा अधिकारी म्हणून त्यांनी नाशिक, रायगड येथे काम केले. दोन वर्षांपूर्वी जालना येथे रुजू झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com