प्रकृती खालावल्याने उपोषणकर्त्यांना जाग्यावरच सलाईन

प्रल्हाद कांबळे
मंगळवार, 23 जुलै 2019

- जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
- पोलिस प्रशासनाचा उपचारासाठी सोबत येण्याचा सल्ला

नांदेड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील आठ दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने, त्यांना पोलिस प्रशासनाचे अधिकारी संदिप शिवले, प्रदीप काकडे, सुनील बडे यांनी समजावून सांगून उपचारासाठी सोबत येण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांनी नकार दिल्याने एका वैद्यकीय पथकाला बोलावून उपोषणस्थळीच सलाईन लावून उपचार सुरू केला आहे. ही जिल्ह्याच्या इतिहासातील पहिली घटना असल्याचे बाेलले जाते. 

शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपरी महिपाल (ता. नांदेड) येथील आदिवासी पारधी समाजाच्या कुटूंबाने गावातील लोकांनी बहिष्कार टाकल्यामुळे पुर्नवसन करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील आठ दिवसापासुन उपोषण केले आहे. 

गावातील काही लोकांनी आदिवासी पारधी समाजावर बहिष्कार टाकल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. हा बहिष्कार कसा दूर करुन संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत ता. १४ जुलैपासून मंगल आणि जॉकी पवार यांनी उपोषण सुरु केले आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: on the spot of fast fasting people are given saline