'साम'चे संपादक आवटे यांना डोईफोडे पत्रकारिता पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

नांदेड - महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा सुधाकरराव डोईफोडे प्रेरणादायी पत्रकारिता पुरस्कार "साम टीव्ही'चे संपादक संजय आवटे यांना जाहीर झाला आहे. पाच जानेवारीला सायंकाळी येथील मिनी सह्याद्री सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली.

मीमांसा फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पत्रकार प्रेस परिषद, समीक्षा व मंथन क्रिएटिव्ह ग्रुपतर्फे दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त वृत्तपत्र क्षेत्रातील विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. मराठवाड्यातील लढवय्ये ज्येष्ठ पत्रकार सुधाकरराव डोईफोडे यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने गेल्या दोन वर्षांपासून "सुधाकरराव डोईफोडे प्रेरणादायी पत्रकारिता पुरस्कार' सुरू करण्यात आला आहे. पहिल्या वर्षी पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात, तर गेल्या वर्षी नांदेडचे ज्येष्ठ पत्रकार माधवराव अटकोरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर्षी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि "साम टीव्ही'चे संपादक संजय आवटे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये रोख, मानपत्र व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराची रक्कम संपादक शंतनू डोईफोडे यांच्याकडून देण्यात येते, असे मंथन क्रिएटिव्ह ग्रुपचे दिलीप माहोरे, भूमन्ना आक्केमवाड, पत्रकार प्रेस परिषदेचे महाराष्ट्राचे प्रभारी अरविंद जाधव, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश पांडे, परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष रूपेश पाडमुख यांनी कळविले आहे.

Web Title: ssanjay avate doifode reporting award