दहावी, बारावीचे विद्यार्थी पुरवणी परीक्षेच्या प्रतीक्षेत, निकाल लागून झाले दोन महिने

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 September 2020

बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होऊन दोन महिने झाले, तर दहावीचा निकाल दीड महिन्यापूर्वी जाहीर झाला; परंतु अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षेची तारीख जाहीर झालेली नाही.

जालना : बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होऊन दोन महिने झाले, तर दहावीचा निकाल दीड महिन्यापूर्वी जाहीर झाला; परंतु अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षेची तारीख जाहीर झालेली नाही, हे विशेष.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यातर्फे दहावी, बारावी परीक्षांचे निकाल जाहीर होऊन जवळपास दोन महिने होत आहेत. यापूर्वी दहावी, बारावी परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षा या जुलै महिन्यात घेतल्या जात असत; परंतु कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीमुळे शैक्षणिक नियोजन बिघडले होते. दहावी, बारावी परीक्षांचा निकाल जाहीर होण्यास दोन महिने लागले.

निकालात नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यासाठी मुदत देते; परंतु अद्यापही मंडळातर्फे आवेदनपत्र भरण्याची मुदत देण्यात आलेली नाही. यामुळे पुरवणी परीक्षा कधी होतील, या संभ्रमात दहावी, बारावीचे विद्यार्थी आहेत. परीक्षेच्या तारखा निश्चित नसल्याने केव्हा परीक्षा होईल, आमचे फॉर्म कधी भरायचे, अशी विचारणा विद्यार्थी शाळा, महाविद्यालयांकडे करीत असल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.

कोरोनाच्या कचाट्यात ४३ केंद्रांवर नीट, लातूर जिल्ह्यातून १६ हजार ८८४ विद्यार्थी...

आमचा निकाल लागून बरेच दिवस झाले; पण परीक्षेचा फॉर्म भरण्याची तारीख आली नसल्याचे पवन गवारे या विद्यार्थ्याने सांगितले. दहावीच्या पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या नसल्याने परीक्षा केव्हा होतील अन् अकरावी प्रवेश होतील, की विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होईल यावर संभ्रम निर्माण झाला आहे.

दहावीच्या पुरवणी परीक्षा लवकर झाल्या तर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची संधी आहे. अन्यथा शैक्षणिक नुकसान होणारच. मंडळाकडून अद्यापही तारखा जाहीर झाल्या नाहीत.
- प्रा. संजय चौधरी, राजूर

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SSC,HSC Board Supplement Examination Waiting Continue