एस.टी.च्या पासधारकांची संख्या वाढतेय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

एस.टी. महामंडळातर्फे चार दिवस, सात दिवस, मासिक पास, त्रैमासिक पास आणि दहा टक्‍के सवलतीच्या पासची सुविधा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील प्रवासी या योजनाचा लाभ घेण्यात आघाडीवर असल्याची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये मासिक पासधारकांची संख्या वर्षभरात साडेपाच हजारांच्या घरात आहे. त्यापोठापाठ त्रैमासिक तीन हजार 864 इतकी आहे

औरंगाबाद - एस.टी. महामंडळातर्फे प्रवाशांसाठी चालविण्यात येत असलेल्या पासच्या विविध योजनांचा मोठा फायदा प्रवाशांना होत आहे. याच पासच्या योजनेतून एस.टी.ला वर्षाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. यामध्ये औरंगाबाद विभागाला गेल्या वर्षभरात साडेचार कोटींचे उत्पन्न मिळाले.

एस.टी. महामंडळातर्फे चार दिवस, सात दिवस, मासिक पास, त्रैमासिक पास आणि दहा टक्‍के सवलतीच्या पासची सुविधा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील प्रवासी या योजनाचा लाभ घेण्यात आघाडीवर असल्याची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये मासिक पासधारकांची संख्या वर्षभरात साडेपाच हजारांच्या घरात आहे. त्यापोठापाठ त्रैमासिक तीन हजार 864 इतकी आहे. औरंगाबाद विभागातील मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक, कन्नड, सिल्लोड, पैठण, वैजापूर, गंगापूर, सोयगाव, फुलंब्री या बसस्थानकांतून एप्रिल 2016 ते मार्च 2017 पर्यंत 19 हजार 99 पासची विक्री झाली. यातून एस.टी.ला चार कोटी 50 लाख 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.

लाल डबा ते निमआराम बसच्या माध्यमातून हे उत्पन्न मिळाले आहे. यंदाही पासधारकांची संख्या वाढत असल्याची माहिती एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

दहा टक्‍के बंदचा बसणार फटका
एस.टी.ने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकिटात सूट मिळावी, यासाठी महामंडळातर्फे दहा टक्‍के सवलतीची वार्षिक योजना सुरू होती. दरवर्षी सहा हजारांहून अधिक प्रवासी या योजनेचा लाभ घेत होते. 200 रुपये भरून वर्षभरासाठी दर तिकिटात दहा टक्‍के सूट मिळण्याची ही योजना होती. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गेल्या 22 एप्रिलपासून ही योजना बंद केली. यामुळे यातून वर्षाकाठी मिळणारे कोट्यवधी रुपये आता मिळणार नाहीत. औरंगाबाद विभागात या योजनेतून एक कोटी 21 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. आता हे उत्पन्न बंद होणार असून याचा फटका एस.टी.ला बसणार आहे.

एस.टी. ला मिळालेल्या उत्पन्नावर एक नजर
पासचा प्रकार --------- पास संख्या------------------------------उत्पन्न
चार दिवस -------13 हजार 299 (साधी व निमआराम बस)------ 1 कोटी 18 लाख 10हजार रुपये
सात दिवस --------386---------(साधी व निमआराम बस)------ 5 लाख 54 हजार रुपये
मासिक पास -------5 हजार 810--(साधी व निमआराम बस)------ 78 लाख 17 हजार रुपये
त्रैमासिक पास------3 हजार 864---(साधी व निमआराम बस)------1 कोटी 27 लाख 91 हजार रुपये
दहा टक्‍के ---------6 हजार 90----(साधी व निमआराम बस)------ 1 कोटी 21 लाख 8 हजार रुपये

Web Title: ST benefited in Aurangabad